वाघांची शिकार रोखा! कायदा कडक करा!! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील वाघांची संख्या आणि जागेचे प्रमाण व्यस्त असल्याने तात्पुरत्या उपाययोजना न करता कायमस्वरूपी उपाययोजना करा. पोलिसांच्या मदतीने तसेच स्थानिकांना विश्वासात घेऊन खबऱ्यांचे जाळे निर्माण करा. वाघांची शिकार रोखण्यासाठी जनजागृतीबरोबरच कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा. प्रसंगी कडक शिक्षेची तरतूद करणे गरजेचे वाटल्यास कायद्यात बदल केला जावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वन विभागाची दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात व्याघ्र संरक्षणासाठी महावितरण, पोलीस, महसूल तसेच वनविभागासह सर्व संबंधित विभागांनी एकत्र येऊन समन्वयाने काम करावे तसेच जिल्हास्तरावर पोलीस अधीक्षकांच्या  अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या व्याघ्र कक्षाच्या बैठका नियमित स्वरूपात घ्याव्यात.

या बैठकीस पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस महासंचालक संजय पांडे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) जीतसिंह, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,  कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक  विरेंद्र तिवारी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक  जितेंद्र रामगावकर, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य बंडू धोत्रे,अनिष अंधेरिया यांच्यासह इतर  मान्यवर उपस्थित होते.

राज्यात 312 वाघ

राज्य वन्यजीव मंडळाच्या 16व्या बैठकीत जाहीर करण्यात आलेल्या 10 पैकी 8 संवर्धन राखीव क्षेत्रांची अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. उर्वरित दोन संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित करण्याची कार्यवाही सुरू आहे. राज्यात एकूण 71 संरक्षित क्षेत्रे अधिसूचित करण्यात आली आहेत. यात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व भारतीय वन्यजीव संस्था देहरादून यांनी केलेल्या गणनेत राज्यात 312  इतकी वाघांची संख्या असल्याचे दिसते. फक्त चंद्रपूर जिह्यात 200 वाघ आढळून येत असल्याने तिथे मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना वारंवार घडताना दिसतात. त्यावर उपाययोजना करण्यासाठी विशेष अभ्यासगटाने दिलेल्या शिफारसी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मान्य केल्या गेल्या असून त्यावर कार्यवाही सुरू असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

नवीन संवर्धन क्षेत्रांचा आराखडा तयार करा – आदित्य ठाकरे

शासनाने नव्याने जाहीर केलेल्या संवर्धन राखीव क्षेत्रांचा व्यवस्थापन आराखडा लवकरात लवकर तयार करावा, अशा सूचना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या. हे संवर्धन राखीव घोषित केल्याने संरक्षित वन क्षेत्रातले ग्रीन कव्हर वाढले का हेही पाहिले जावे तसेच ज्या ठिकाणी पुनर्वनीकरण करणे आवश्यक आहे तिथे वृक्षलागवड केली जावी. महामार्गालगतही वृक्षलागवडीचा विचार केला जावा, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

वाघांच्या वाढणाऱ्या संख्येनुसार नियोजन करा

वन व्यवस्थापन करतांना वाघांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन त्यांच्या भविष्यकालीन व्यवस्थापनाचे नियोजनही करण्यात यावे.  ज्या ठिकाणी वन्यजीवांचे अपघात होतात अशी क्षेत्रे निश्चित केली जाऊन तिथे आवश्यक त्या पर्यायी उपाययोजना  राबविण्यात याव्यात.  जंगलात विकासकामे करतांना विशेषतः रेल्वे लाईनचे नियोजन करतांना राज्याच्या वन विभागाशी चर्चा करून त्याचे नियोजन केले जावे, जेणेकरून वन्यजीवांना होणारा धोका टाळता येऊ शकेल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.