
सणवार, उत्सवांबाबतच्या आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आज विषय आरोग्याचा आणि नागरिकांचे प्राण वाचवण्याचा आहे. उत्सवाचा उत्साह असू दे, पण जिवाची काळजी घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गोविंदा पथकांना केले. काही काळासाठी आपले सणवार, उत्सव बाजूला ठेवून जनतेचे प्राण वाचवण्याला महाराष्ट्राने प्राधान्य दिले हा संदेश आपण सर्व मिळून जगाला देऊया, संयम आणि धीराने आधी कोरोनाला हद्दपार करूया, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यातील गोविंदा पथकांशी ऑनलाइन बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संवाद साधला.
मुख्यमंत्री म्हणाले…
जेव्हा पहिले प्राधान्य कशाला द्यायचे हा प्रश्न समोर येतो तेव्हा साहजिकच पहिल्यांदा आरोग्याचा विचार करावा लागतो.
मागील दीड वर्षांपासून आपण कोरोना विषाणूविरुद्ध लढत आहोत, त्यामुळे आपल्यावर बंधने आली आहेत पण ही बंधने कुणासाठी याचादेखील विचार करण्याची गरज.
या निर्बंधाविरुद्ध आंदोलन करण्याचे काहीजण बोलतात. त्यांनी शासनाविरोधात आंदोलन करण्यापेक्षा कोरोनाविरुद्ध आंदोलन करावे.
नीती आयोगाने परवाच आपल्या अहवालात तिसऱया लाटेची शक्यता आणि लागणाऱया आयसीयू बेडची संख्या याचा अंदाज व्यक्त करून आपली काळजी वाढवली आहे. हा विषाणू घातक आहे. अजून आपल्याकडे ठोस औषध उपलब्ध नाही, पण कोरोनाला रोखण्याचा मार्ग आपल्याला कळला आहे. काही जिह्यांत दुसरी लाट जोरात आहे. एकाच दिवशी 11 लाख लोकांचे लसीकरण करून आपण एक विक्रम प्रस्थापित केला, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
ऑक्सिजन, आयसीयू बेडची संख्या वाढवत आहोत. पण ऑक्सिजननिर्मिती रोज 1200 ते 1300 मे. टन इतकीच मर्यादित आहे. कोरोना रुग्णांसाठीच्या ऑक्सिजनची मागणी 750 मे. टनांच्या वर गेल्यास आपल्याला नाईलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
काही ठिकाणी संसर्ग कमी झालेला दिसत असला तरी आपल्यासाठी हा ‘विंडो पिरियड’ आहे. ज्याचा उपयोग आपल्याला आपले अर्थचक्र सुरळित ठेवण्यासाठी आणि तळहातावर पोट असलेल्यांना दिलासा देण्यासाठी करावयाचा आहे.
तर मिळालेले यश वाया जाईल –अजित पवार
महाराष्ट्रात अजून दुसरी लाट ओसरलेली नाही, त्यात तिसऱया लाटेची शक्यता वर्तवली जात आहे, डेल्टा प्लस विषाणू घातक आणि वेगाने पसरणारा आहे, हे सगळे सांगितले जात असताना धोका स्वीकारण्यात अर्थ नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
अजूनही तरुणांचे पूर्णपणे लसीकरण झालेले नाही – चहल
या उत्सवात मोठय़ा प्रमाणात तरुणवर्ग सहभागी होतो जो 35च्या आतल्या वयोगटातील असतो. अजूनही आपल्याकडे या वयोगटातील युवकांचे पूर्णपणे लसीकरण झालेले नसल्याचे आयुक्त चहल यांनी यावेळी सांगितले. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आयुक्तांच्या सूचनेला दुजोरा दिला. कोरोनाकाळात गणेशोत्सवासह सर्व सण साधेपणाने साजरे करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
आरोग्यविषयक उपक्रम राबवून उत्सव साजरा करणार, गोविंदा पथकांचे आश्वासन
उपस्थित दहीहंडी पथकांच्या पदाधिकाऱयांनीही मुख्यमंत्र्याच्या कळकळीच्या विनंतीला प्रतिसाद देत दहीहंडीऐवजी कोरोनाचे सावट लक्षात घेऊन सामाजिक तसेच आरोग्यविषयक उपक्रम हाती घेऊन हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करू, अशी भावना व्यक्त केली.
बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, परिवहनमंत्री अनिल परब, आमदार सुनील प्रभू, अजय चौधरी, प्रताप सरनाईक, माजी मंत्री सचिन अहीर, माजी आमदार बाळा नांदगावकर, मुख्य सचिव सीताराम पुंटे, अपर मुख्य सचिव गृहविभाग मनुकुमार श्रीवास्तव, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, पोलीस अधिकारी, दहीहंडी समन्वय समितीचे पदाधिकारी, गोविंदा पथकांचे सदस्य उपस्थित होते.
एकामुळे पथकाला कोरोनाची भीती -डॉ. संजय ओक
डॉ. संजय ओक यांनी दहीहंडीचा उत्सव हा अतिशय जवळून, एकमेकांच्या सहकार्याने साजरा करण्यात येणारा सण आहे. या खेळात मानवी थर रचले जात असताना एकमेकांना जवळून स्पर्श होतो, थर लावताना अंगावर पाणी टाकले जाते, पावसाळा सुरू आहे, पाण्याने मास्क भिजला तर मास्कची सुरक्षितता संपूर्ण संपुष्टात येते हे सांगताना ‘डेल्टा प्लस’ हा विषाणू घातक असून तो वेगाने पसरत असल्याची माहिती उपस्थितांना दिली. दहीहंडी पथकातील एखाद्या गोविंदाला जरी लागण झालेली असेल तर पूर्ण चमू ताबडतोब बाधित होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. कोरोनाने आजही आपण आपले आप्तस्वकीय गमावत असल्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आणि हा सण आपण रक्तदान, औषधे आणि कोरोना प्रतिबंधात्मक साधनांचा पुरवठा करून साजरा करू, आपल्या उत्सवाचे ‘स्पिरिट’ वेगळ्या पद्धतीने जपू असे आवाहन केले. यावेळी डॉ. राहुल पंडित, डॉ. शशांक जोशी, डॉ. सुहास प्रभू, डॉ. अजित देसाई यांनीदेखील संसर्ग रोखण्यालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे मत व्यक्त केले.






























































