सीएनजी पंपचालकांचा बेमुदत संप लांबणीवर, आठ दिवसांत निर्णय न झाल्यास संपावर जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गॅस पुरवठा कंपनीकडून योग्य कमिशन मिळत नसल्याकारणाने पुणे जिल्ह्यातील (ग्रामीण) सीएनजी पंपचालकांकडून सोमवारपासून पुकारण्यात येणारा बेमुदत संप तात्पुरत्या स्वरूपात लांबणीवर पडला आहे. राज्य शासनाने यावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी केल्याने हा संप पुढे ढकलण्यात आला आहे. यानंतरही कंपनीने मागणी मान्य न केल्यास आठ दिवसानंतर पुन्हा संप पुकारला जाईल, अशी माहिती पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी दिली.

कंपनीकडून सीएनजी पंप धारकांना सुधारीत ‘व्यापार मार्जिन’ मिळत नसल्यामुळे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने आजपासून अनिश्चित काळासाठी संप पुकारण्याचा निर्णय घेतला होता. पुणे ग्रामीण भागांतील टोरेंट सीएनजी पंपावरून सीएनजी विक्री न करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांसह प्रशासनाची धावपळ उडाली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाच्यावतीने डीलर्स असोसिएशन पदाधिकार्‍यांशी संवाद साधण्यात आला. तर, राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून टोरेंट गॅस लिमीटेड या कंपनीच्या कार्यकारी संचालकांना आदेश देण्यात आले आहेत. कंपनीने पंपधारकांना तात्काळ सुधारीत ट्रेड (व्यापार) मार्जिन लागू करण्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या वतीने सोमवारपासून होणारा संप तात्पुरता पुढे ढकलण्यात आला आहे. पुणे शहरातील पंप सुरळीत सुरू असल्याचे असोसिएशनकडून सांगण्यात आले.

पंपचालकांना सुधारीत कमिशन द्या, अशा सूचना अन्न नागरी पुरवठा व संरक्षण विभागाने टोरेंट कंपनीला दिल्या आहेत. त्यामुळे संप पुढे ढकलण्यात आला आहे. आठ दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा संप पुकारला जाईल.
– ध्रुव रुपारेल, अध्यक्ष, पेट्रोल डिलर्स असोसिएशन, पुणे.