सहकार विभागात निवृत्त अधिकाऱ्यांची वर्णी लागणार, सहनिबंधक पदावर करार पद्धतीने नियुक्ती होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सहकार विभागात आता निवृत्त अधिकाऱ्यांची वर्णी लागणार आहे. सहकार विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे सदर पदाशी संलग्न असलेली कामे प्रलंबित राहात आहेत. त्या पार्श्वभूमीवर सहकार विभागातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची करार पद्धतीने नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानुसार सहनिबंधक लेखा या पदासाठी सहकार आयुक्तांनी सहनिबंधक या पदावरून निवृत्त झालेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.

सहनिबंधक लेखा या पदासाठी अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त असू नये, त्यांच्या विरोधात कोणतीही चौकशी सुरू नसावी किंवा प्रलंबित नसावी असे आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे. संबंधितांना नियमित पदाप्रमाणे मासिक मानधन दिले जाणार आहे. इच्छुकांनी पुढील दहा दिवसांत आपला अर्ज सहकार आयुक्त, पुणे यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. दरम्यान, या पदाच्या कामकाजाचे स्वरूप संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याचे सहकार आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.