कोळसा घोटाळाप्रकरणी अदानींच्या अडचणी वाढल्या; एकवीस आंतरराष्ट्रीय संघटनांचे सरन्यायाधीशांना पत्र

gautam-adani

इंडोनेशियातील कोळसा सोन्याच्या दराने विकून मोठा घोटाळा करणाऱया गौतम अदानींना तब्बल 21 आंतरराष्ट्रीय संघटनांनी जोरदार दणका दिला आहे. याप्रकरणी डीआरआय अर्थात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर निकाल लावण्याची विनंती करणारे पत्र संघटनांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना लिहिले आहे. त्यामुळे अदानींच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. या सर्व आंतरराष्ट्रीय संघटना कोळशासारख्या जिवाश्म इंधनाच्या निरंतर वापराच्या विरोधात आहेत.

गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराशी संबंधित जॉर्ज सोरोस यांच्या महत्त्वाच्या दस्तावेजाचा हवाला देत लंडनमधील ‘फायनान्शियल टाइम्स’ने अदानींच्या कोळसा घोटाळाप्रकरणी वृत्त प्रकाशित केल्यानंतर 21 आंतरराष्ट्रीय संघटना अदानींविरोधात आक्रमक झाल्या आहेत. अदानी इंडोनेशियातून कोळसा खरेदी करत होते. तो हिंदुस्थानात येईपर्यंत त्याचे दर दुप्पट होत होते. तामीळनाडूतील सरकारी पंपनी टँगेडकोशी अदानी यांनी व्यवहार केला होता. या व्यवहाराच्या माध्यमातून अदानी यांनी मोठा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

या संघटनांनी सादर केले पत्र

ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर इंटरनॅशनल जस्टिस, बँकट्रक, बॉब ब्राऊन फाऊंडेशन, कल्चर अनस्टेन, एको, एक्स्टिन्क्शन रीबेलिशन, फ्रेन्ड्स ऑफ अर्थ ऑस्ट्रेलिया, लंडन मायनिंग नेटवर्क, मॅके कन्झर्वेशन ग्रुप, मार्केट फोर्सेस, मनी रीबेलिशन, मूव्ह बियॉण्ड कोल, सीनियर्स फॉर क्लायमेट अॅक्शन नाऊ, स्टँड अर्थ, स्टॉप अदानी, सनराईज मूव्हमेंट, ट्रिपल पॉइंट, टॉक्सिक बॉण्ड्स, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ऑस्ट्रेलिया, डब्ल्यू अँड जे नागना यारबॅन कल्चरल कस्टोडियन्स आणि क्वीन्सलँड कन्झर्व्हेशन कौन्सिल या आंतरराष्ट्रीय संटनांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आहे.

एकवीस आंतरराष्ट्रीय संघटनांचे सरन्यायाधीशांना पत्र

‘फायनान्शियल टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा हवाला देत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षांनी अदानींच्या कोळसा घोटाळाप्रकरणी संयुक्त संसदीय समिती नेमण्याची मागणी केली आहे. तसेच इंडिया आघाडीचे सरकार आल्यास ही संयुक्त संसदीय समिती नेमून अदानींच्या घोटाळ्याची चौकशी केली जाईल अशी घोषणाही राहुल गांधी यांनी अलीकडेच केली होती. दरम्यान, अदानी समूहाने मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.