कोस्टल रोडने वेग घेतला, दोन जेट्टींचे काम जोरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला वेगवान बनवणाऱ्य़ा कोस्टल रोडच्या बांधकाम साहित्याची वाहतूक आता समुद्रमार्गे केली जाणार आहे. यासाठी अमरसन्स आणि वरळी डेअरी येथे दोन जेट्टी उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. त्यामुळे रोड वाहतूक कमी झाल्याने वाहतूक कोंडी फुटणार असून बांधकाम साहित्य कमी वेळात उपलब्ध झाल्याने कोस्टल रोडचे कामही आणखी वेगाने होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील आणि मुंबईला वेगवान बनवणाऱ्य़ा पालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडचे काम सध्या वेगात सुरू आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी-लिंकपर्यंतच्या 9.98 किमीच्या मार्गासाठी एक हजार कर्मचारी-कामगार-अधिकारी यांच्यासह अत्याधुनिक मशिनरीच्या माध्यमातून काम केले जात आहे. शिवाय मालवाहतुकीसाठी दिवसाही परवानगी देण्यात आल्याने कामाला गती मिळाली आहे. सध्या सुमारे 1500 डंपर-ट्रक, ट्रॉलीच्या माध्यमातून रस्तामार्गे रोडसाठी लागणाऱ्य़ा साहित्याची ने-आण केली जात आहे. मात्र मोठय़ा प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरू असल्याने नियमित वाहतुकीला काही वेळा फटका बसत आहे. त्यामुळे खडी, भलेमोठे दगड, लोखंडी साहित्य अशा बांधकाम साहित्याची वाहतूक समुद्रमार्गे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, 9.98 किमीच्या मार्गात असणाऱ्य़ा एकूण 3.45 किमीचा बोगदा खोदण्यासाठी लागणारी महाकाय टनेल मशीन बसवण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ऑक्टोबरपासून कामाचा वेग आणखीच वाढणार आहे.

9.98 किमी टोल फ्री सुस्साट

कोस्टल रोडमुळे प्रिन्सेस स्ट्रीट या मुंबईच्या दक्षिण टोकापासून थेट वांदय़ापर्यंतचा 9.98 किमीचा प्रवास मुंबईकरांना टोल-फ्री रस्त्यावरून सुसाट करता येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून वेळ आणि इंधनाची बचत होणार असल्याने मुंबईच्या विकासालाही चालना मिळणार आहे. कोस्टल रोडमुळे वेळेची बचत 70 टक्के होईल, तर प्रतिवर्षी इंधनाची बचत 34 टक्के होईल. शिवाय ध्वनी आणि वायुप्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

15 टक्के काम पूर्ण

डिसेंबर 2022 पर्यंत कोस्टल रोडचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 15 टक्के काम पूर्ण झाले आहे. कामाची डेडलाइन पाळण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरली जात आहे.