कोस्टल रोड, वर्क इन प्रोगेस! यंत्रणेची जोरदार जमवाजमव सुरू, निर्धारित वेळेत काम पूर्ण करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
coastal-road-for-mumbai

मुंबईला सुपरफास्ट बनवणाऱया कोस्टल रोडच्या कामावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने 17 डिसेंबरला उठवल्यामुळे आजपासूनच कोस्टल रोडच्या कामाला सुरुवात झाली. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी-लिंकपर्यंतच्या कोस्टल रोडचे काम करणाऱ्या दोन्ही कंत्राटदारांनी कामासाठी आवश्यक असणाऱया यंत्रसामग्रीची जोरदार जमवाजमव सुरू असून काही ठिकाणी प्रत्यक्ष कामही सुरू झाले आहे. त्यामुळे कोस्टल रोडचे काम निर्धारित वेळेतच पूर्ण होईल असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील पालिकेच्या महत्त्वाकांक्षी ‘कोस्टल रोड’ प्रकल्पावरील स्थगिती सुप्रीम कोर्टाने उठवल्यामुळे मुंबई सुपरफास्ट होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यात प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतचा 9.98 किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येणार आहे. 12 ऑक्टोबर 2018 रोजी हे काम सुरूही करण्यात आले. मात्र या प्रकल्पामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने उच्च न्यायालयाने 16 जुलै 2019 साली कोस्टल रोडला स्थगिती दिली. यानंतर पालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत 19 जुलैला स्थगिती दिल्याने कोस्टल रोडचे काम तब्बल 154 दिवस पूर्णपणे ठप्प झाले होते. मात्र मुंबईतील वाहतूक व्यवस्थेसाठी कोस्टल रोडसारख्या वाहतुकीच्या पर्यायांची गरज असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने स्थगिती उठवली. मात्र स्थगिती उठवताना केवळ रस्त्याच्या कामालाच परवानगी दिली आहे. त्यामुळे कोस्टल रोडच्या कामात अंतर्भूत असणारी उद्याने आणि रस्त्यालगत होणारी इतर प्रस्तावित विकासकामे सध्या तरी होणार नाहीत. परिणामी रस्त्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, कोस्टल रोडपैकी प्रिन्सेस स्ट्रीट ते बडोदा पॅलेसपर्यंतचे काम एल ऍण्ड टी तर बडोदा पॅलेस ते वांद्रे सी लिंकपर्यंतचे काम एससीसी-एचडीसी ही कंपनी करणार असून दोन्ही कंत्राटदारांकडून काम सुरू करण्यात आले आहे.

चार वर्षांची डेडलाइन पाळणार
प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी-लिंकपर्यंत कोस्टल रोडच्या कामासाठी पालिका सुमारे 13 हजार कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. 13 ऑक्टोबर 2022 सालापर्यंत म्हणजेच चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक होते. 12 ऑक्टोबर 2018 सालामध्ये सुरुवात करण्यात आली, मात्र रस्त्याचे सुमारे 17 टक्के काम झाले असताना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने आतापर्यंत 154 दिवस काम बंद होते. यामुळे दररोज पाच कोटींचे नुकसानही झाल्याने सुमारे 770 कोटींचे नुकसानही झाले आहे. असे असले तरी प्रस्तावित काम वेळेत पूर्ण करू आणि डेडलाइन पाळू असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

कोस्टल रोडसाठी देशात पहिल्यांदाच महाकाय टीबीएम
मुंबईतील कोस्टल रोडसाठी कराव्या लागणाऱया भुयारी कामासाठी देशात पहिल्यांदाच 84 मीटर लांबीची टनेल बोअरींग मशीन (टीबीएम) आणली जाणार आहे. ही मशीन वेगवेगळ्या भागांच्या स्वरूपात 48 कंटेनर्समधून येत्या एक-दीड महिन्यात चीनमधून आणली जाणार आहे. लवकरच ही कंटेनर्स मालवाहू जहाजांमधून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यानंतर हे सुटे भाग मुंबईत जोडले जाणार आहेत. ते जोडण्यासाठीच किमान तीन महिन्यांचा काळ लागणार आहे. 12.19 मीटर व्यासाची ही मशीन असून तिचे वजन 2200 मेट्रिक टन इतके आहे. कोस्टल रोडला प्रियदर्शिनी पार्क ते गिरगाव असा भुयारी मार्ग बनवला जाणार आहे. ते भुयारीकरण या टीबीएमने केले जाणार आहे. ही मशीन हिंदुस्थानात आणली जाणार असल्याने तिला तिरंगा झेंडय़ाचा रंग चढवला गेला असून मशीनवर ‘मुंबई कोस्टल’ असा उल्लेखही करण्यात आला आहे.