फिरोजाबादमध्ये पोलीस ठाण्यातच शिरला कोब्रा; अर्ध्या तासाच्या गोंधळानंतर पकडण्यात यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमधील रामगढजवळील पोलीस ठाण्यात दोन फूटांचा कोब्रा नाग शिरला होता. नागाला पाहताच पोलीस ठाण्यात एकच गोंधळ उडाला. पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी तेथून सुखरूपपणे बाहेर पडले. काहीजणांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फणा उभारून फुत्कारत असल्याने त्याच्याजवळ जाण्याचे धाडस कोणीही केले नाही. पोलीस ठाण्यातच कोब्रा शिरल्याने पोलीस कर्मचारीही धास्तावले होते. त्याला कसे बाहेर काढायचे, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता.

हे पोलीस ठाणे खुल्या जागेत असल्याने दरवर्षी पावसाळ्यात या भागात सापांचा वावर असतो. मात्र, यंदा थेट पोलीस ठाण्यातच कोब्रा शिरल्याने सर्व धास्तावले होते. दोन फूटांचा फुत्कारणारा कोब्रा बघून सगळ्यांचीच पाचवर धारण बसली होती. फुत्कारणाऱ्या नागापासून बचाव करण्यासाठी सर्व कर्मचारी सुरक्षितपणे पोलीस ठाण्याबाहेर पडले. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना डसण्याचाही त्याने प्रयत्न केला.

सुमारे अर्धा तास या कोब्राला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, कोब्रा कोणालाही जुमनत नव्हता. अखेर या पोलीस ठाण्यात तैनात असलेले हवालदार अनुज कुमार कामावर आले. त्यांना घडलेला प्रकार समजल्यावर त्यांनी पुढाकार घेत आपला सापांना पकडण्याचा अनुभव आणि कौशल्य पणाला लावत कोब्राला पकडले आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

कोब्राला बघितल्यावर सुरुवातीला त्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फणा उभारुन डसण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याला पकडणे कठीण होते, असे अनुजकुमार यांनी सांगितले. प्रशिक्षणादरम्यान साप, नाग, विंचू यांच्यापासून बचाव करत त्यांना कसे पकडायचे, हे आम्हाला शिकवण्यात आले होते. त्यामुळे न घाबरता संयम राखत कोब्राचे लक्ष दुसरीकडे विचलीत करून त्याला पकडल्याचे अनुप कुमार यांनी सांगितले.

या पोलीस ठाण्यात आतापर्यंत अनेक साप आढळले आहेत. मात्र, ते बिनविषारी होते. मात्र, कोब्रा विषारी नाग असल्याने त्याच्यापासून बचाव करत त्याला पकडणे गरजेचे होते. सुदैवाने अथक प्रयत्नानंतर कोब्राला पकडण्यात आम्हाला यश आले. त्याला दूर जंगलात सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अनुप कुमार यांनी दाखवलेल्या साहसाबद्दल वरिष्ठ पोलीस अधीक्षक अशोककुमार शुक्ला यांनी त्यांचे कौतुक केले आहे. अनेकजण साप दिसल्यावर त्याला मारायला धावतात. त्यात साप बिथरून तो दंश करतो. त्यामुळे स्वतःवर संयम ठेवत त्याला पकडणे महत्त्वाचे असते. अनुप कुमार यांनी परिस्थिती योग्यप्रकारे हाताळल्याचे त्यांनी सांगितले.