कुलाब्यातील जीर्ण इमारतींतील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा!

कुलाब्यातील कुलाबा चेंबर्स, करीमभाई मॅनॉर, मोहम्मदभॉय मॅन्शन, मेहमुद बिल्डींग, माहिम मॅन्शन आणि डोंगरी येथील डोसा बिल्डींग या इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यांच्या पुनर्बांधणीसाठी सल्लागार नेमून अहवाल सादर करा आणि इमारतींमधील रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

मुंबईतील सर करीमभाई इब्राहिम ट्रस्टच्या निर्वासित झालेल्या पाच इमारती व डोसा बिल्डींग या इमारतीतींल रहिवाशांच्या पुनर्वसनासंदर्भातील बैठक मंत्रालयात झाली. यावेळी वडेट्टीवार म्हणाले, इमारतींमधील व्यावसायिक आणि रहिवासी यांचे पुनर्वसन करताना नियमानुसार त्यांना जागा देण्यात यावी. कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने राबवावी. बैठकीला जिल्हाधिकारी राजीव निवतकर, व्यवस्थापकीय अधिकारी आशा शेंडगे, म्हाडाचे कार्यासन अधिकारी एस.एम.अहिरराव, कार्यकारी अभियंता एस.व्ही. वारर्डे आदी उपस्थित होते.

स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल द्या!

चेंबुर येथील शासकीय जमिनीवरील 34 इमारतींचे पुनर्वसन करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱयांनी स्ट्रक्चरल ऑडीट करावे. उर्वरित 12 इमारतींसंदर्भात शासनाची परवानगी न घेता ज्या बांधकाम व्यावसायिकांनी पुनर्वसनाचे काम सुरू केले आहे, ते तातडीने थांबविण्यात यावे. या कामांचा अहवाल एक महिन्याच्या आत तातडीने सादर करण्याचे निर्देश विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या