श्रीलंकेत आणखी दहशतवादी हल्ले होण्याची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। कोलंबो

श्रीलंकेत गेल्या महिन्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतरही तणाव कायम असून आणखी दहशतवादी हल्ले होण्याची भीती सरकारने व्यक्त केली आहे. पोलीस, लष्कर सज्ज असून नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

श्रीलंकेत ज्या दहशतवादी गटाने हल्ले केले त्याच गटातील दहशतवादी कोलंबो शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांसह महत्त्वाचे पूल पुन्हा उडवून देण्याचा दहशतवाद्यांचा कट असल्याचे सरकारने म्हटले आहे. इसिसशी संबंधित नॅशनल तौहिद जमात या दहशतवादी गटाने श्रीलंकेत बॉम्बस्फोट उडवले होते. या पार्श्वभूमीवर पुन्हा लष्कर आणि पोलिसांनी संयुक्तपणे शोधमोहिमा सुरू केल्या आहेत.

बॉम्बस्फोटांसाठी सोशल मीडियाचा वापर

बॉम्बस्फोटांचा सूत्रधार जहरान हाश्मी याने सोशल मीडियाचा वापर केल्याचे समोर आले आहे. अनेक महिन्यांपासून सोशल मीडियाच्या चॅटरूममधून तो आत्मघाती हल्लेखोरांना मानसिकदृष्टय़ा तयार करत होता. त्यासाठी त्याने फेसबुक आणि यूटय़ूबचा वापर केला. हाश्मी याने उघडपणे बिगर मुस्लिमांना ठार मारले पाहिजे असे आवाहन केले होते. श्रीलंकेतील मुस्लीम तरुणांच्या मनात विष कालवण्याचे काम त्याने केले.

मशिदींना सुरक्षा

शुक्रवार असल्यामुळे सामूहिक प्रार्थनेसाठी मशिदींमध्ये जमलेल्या मुस्लिमांच्या संरक्षणासाठी मोठय़ा प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. हल्ला होईल या भीतीने गेल्या शुक्रवारी अनेक मशिदी बंद होत्या. त्यामुळे मशिदींना मोठय़ा प्रमाणात संरक्षण पुरवण्यात आले होते.