
सामना ऑनलाईन । मुंबई
मागील महिन्यात कुर्ला स्थानकावर घाणेरडय़ा पद्धतीने सरबत बनवणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालिकेने सरबत, उसाचा रस आणि बर्फगोळा विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू केली असून सलग दुसऱ्या महिन्यातही तब्बल 81 टक्के नमुने दूषित आढळल्याचे समोर आले आहे. मार्चमधील कारवाईत 87 टक्के नमुने दूषित आढळले होते.
राज्यभरात सध्या पारा चाळिशी पार गेला आहे. तर मुंबईचे 33 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असले तरी अरबी समुद्राकडून येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांमुळे वातावरणात 40 अंश तापमानाइतका प्रचंड उकाडा जाणवत आहे. यामुळे हैराण होणारे मुंबईकर नाक्यानाक्यावर मिळणारा सरबत, उसाचा रस आणि बर्फाचे गोळे खाऊन दिलासा मिळवत आहेत. मात्र हा दिलासा महागात पडण्याची शक्यता आहे. कारण पालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत 80 टक्क्यांहून जास्त नमुने घातक असल्याचे समोर येत आहे.
























































