
नाशिक शहरात थंडीचा कडाका वाढत चालला असून, मंगळवारी या मोसमातील नीचांकी 10.8 अंश सेल्सिअस तापमानाची शहरात नोंद झाली, येथे सोमवारच्या तुलनेत तापमानात एक अंशांनी घट झाली, तर निफाडचा पारा 8.5 वरून 9.5 वर पोहचला. जिल्ह्यात सर्वत्र दिवसाही चांगलाच गारवा जाणवत होता.
निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात सोमवारी या मोसमातील जिल्ह्यातील नीचांकी 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येथे सोमवारच्या तुलनेत मंगळवारी तापमान एक अंशांनी वाढले. कुंदेवाडीत मंगळवारी किमान 9.5, कमाल 27.5 तापमान नोंदवले गेले. याच तालुक्यातील उगाव येथे सोमवारप्रमाणेच मंगळवारीही पारा 10 अंशांवर स्थिर होता. नाशिक शहरात एक अंशांनी पारा घसरला, सोमवारी 11.4 तर मंगळवारी 10.8 तापमान होते. पुढील सहा दिवस शहराचा पारा 10 ते 11 अंशांदरम्यान राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.