
लॉकडाऊनमुळे सुट्टीत गावी आईकडे जाता येत नसल्याच्या नैराश्येतुन कॉलेज युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. प्रेरणा कुंतीनाथ कल्याणकर (वय – 17, रा. तारा कॉलनी, आरकेनगर, पाचगाव, मूळ गाव अकोळ,कर्नाटक) असे या कॉलेज युवतीचे नाव आहे. या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूळची कर्नाटक येथील प्रेरणा वडिलांचे छत्र हरपल्याने गेल्या दोन वर्षांपासून येथे आजोळी आजी-आजोबांकडे शिक्षणासाठी राहत होती. येथील भवानी मंडप परिसरातील एका ज्युनिअर कॉलेज मध्ये ती इयत्ता अकरावीत शिक्षण घेत होती. सुट्टीमध्ये तिला अकोळ गावी आईकडे जायचे होते. पण लॉकडाऊनमुळे कोगनोळी नाक्यावरून दोन वेळा तिला परत पाठवण्यात आले होते.
आईला भेटण्यासाठी आतुर झालेल्या प्रेरणाला गावी जाता येत नसल्याने गेल्या दोन-तीन दिवसांपासून ती निराश झाली होती. याच नैराश्येतून तिने येथील राहत्या घरी आज सकाळी अकराच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. लाॅकडाऊनमुळे आईला भेटता येत नसल्याच्या नैराश्येतुनच तिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून करवीर पोलिसांकडुन अधिक तपास करण्यात येत आहे.
























































