अकरावीच्या प्रत्येक प्रवेश फेरीत कॉलेज पर्याय बदलता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईसह पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती व संभाजीनगर विभागात अकरावीचे प्रवेश हे ऑनलाइन पद्धतीने होणार असून बायफोकल आणि आर्टस्, कॉमर्स, सायन्स शाखेच्या प्रत्येक प्रवेश फेरीत विद्यार्थ्यांना कॉलेजचे पर्याय बदलण्याची संधी मिळणार आहे. प्रवेशप्रक्रियेसंदर्भात माहिती हवी असल्यास विद्यार्थी-पालकांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील संपर्क केंद्रात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर मम्हाणे यांनी केले आहे.

अकरावी प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २५ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्जात कॉलेजची गेल्या वर्षीची कटऑफ पाहूनच कॉलेज पर्याय निवडावे असे आवाहन मम्हाणे यांनी केले आहे. तसेच कोटय़ातून प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांनादेखील ऑनलाइन अर्ज भरणे बंधनकारक असल्याचे मम्हाणे यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज शाळेतूनच सादर करावेत. तसेच विद्यार्थ्यांची ऑनलाइन गुणपत्रिका तपासून त्याच्या आधारे शाळांनी विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला प्रमाणित करून द्यावा, अशा सूचना शिक्षण विभागाने जारी केल्या आहेत.

-शून्य फेरीमध्ये बायफोकलचे प्रवेश दोन फेरीत होणार आहेत.
-बायफोकलसाठी कमीत कमी एक तर जास्तीत जास्त ३० कॉलेजचे पर्याय नोंदवणे गरजेचे आहे.
-दुसऱया गुणवत्ता यादीवेळी कॉलेज पर्याय बदलण्याची संधी आहे.
-आर्टस्, कॉमर्स, सायन्स आणि एचएसव्हीसी प्रवेशाच्या चार फेऱया होतील. त्यानंतर प्रथम येणाऱयास प्राधान्य तत्त्वावर प्रवेश दिले जातील.
-विद्यार्थ्याला पहिल्या पसंतीच्या कॉलेजात प्रवेश मिळाल्यास प्रवेश घेणे बंधनकारक आहे, अन्यथा तो विद्यार्थी बाद होणार.