पुलगावचे 20/11

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> कर्नल अभय बा. पटवर्धन

आपण इतिहासापासून कोणताच धडा घेत नाही हे पुलगावमधील चार दिवसांपूर्वी झालेल्या स्फोटाने पुन्हा सिद्ध केले. दुर्घटना घडली की आश्वासनांची खैरात केली जाते आणि नंतर पुन्हा दुर्घटना घडेपर्यंत सर्व शांत होते. पुलगाव दारूगोळा भांडारात घडलेल्या ‘20/11’ची हीच शोकांतिका आहे. 2016 मध्ये या ठिकाणी झालेला स्फोट दारूगोळ्याचा साठा करण्यात हलगर्जीपणा केल्यामुळे झाला होता, तर नुकताच झालेला स्फोट दारूगोळा हाताळण्यातील हलगर्जीपणामुळे झाला. या दुर्घटनेची आता रीतसर चौकशी होईल, दोषारोपांचा गदारोळ माजेल आणि काही दिवसांनी हा स्फोटदेखील विस्मरणात जाईल.

वर्ध्याजवळील पुलगाव येथील दारूगोळा भांडारात 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला आणि बारा जण गंभीर जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार निकामी (आऊटडेटेड) दारूगोळा नष्ट करत असताना दारूगोळ्याच्या पेटाऱ्यांची (अॅम्युनेशन बॉक्सेस) हाताळणी हलगर्जीपणे झाल्याने ही दुर्घटना घडली. पुलगावमधे देशातील सर्वात मोठा अॅम्युनेशन डेपो आहे. ज्यात अगदी बोफोर्स तोफांचे लाईव्ह शेल्स किंवा सुखोई विमानातील क्षेपणास्त्रांपासून हॅण्ड ग्रेनेडच्या लहानशा डिटोनेटरपर्यंत सर्व प्रकारचा, ताजा व जुना दारूगोळा साठवलेला असतो. दोन वर्षांपूर्वी उन्हाळ्यात येथे अशीच एक भयंकर मोठी दुर्घटना झाली होती. त्यात 16 लोकांचा मृत्यू होऊन 40पेक्षा अधिक जखमी झाले होते. अर्थात तो स्फोट उन्हाळ्यामुळे प्रचंड वाढलेल्या उष्णतेमुळे बॉम्ब आणि शेल्समधली दारू ‘अनस्टेबल’ होऊन झाला होता. प्रचंड उष्णतेमुळे साठवलेल्या दारूगोळ्यात ‘डॉमिनो चेन रिअॅक्शन इफेक्ट’ होऊन त्यावेळी अनेक मोठे स्फोट झाले. मात्र गेल्या आठवड्यात पुलगावमध्ये जी दुर्घटना घडली ती मानवी हलगर्जीपणामुळे असे म्हणता येईल. दारूगोळा नष्ट करण्यासाठी नेला जात असताना चुकीच्या पद्धतीने हाताळला गेला असावा आणि त्याचा परिणाम दुर्घटनेत झाला असावा.

पुलगाव हे देशाच्या मध्यभागी वसले असून लष्कर, नौसेना व वायुसेना यांना लागणारा दारूगोळा तेथून रस्ते आणि रेल्वे अशा दोन्ही मार्गांनी समुद्री किनाऱ्यांवरील नौदलाची केंद्रे, सीमेवरील लष्कराच्या छावण्या आणि वायू दलाला पुरवला जाऊ शकतो. या सुविधेमुळेच ब्रिटिशांनी देशातील सर्वात मोठे दारूगोळा भांडार येथे स्थापन केले होते. जवळपास दहा बाय बारा किलोमीटरच्या परिघात हे दारूगोळा भांडार वसले आहे. तेथील दारूगोळा नष्ट करण्यासाठी वेगळी जागा आहे. संरक्षण दलांना दारूगोळा देण्यात आल्यावर त्याची विभागणी फर्स्ट लाइन, सेकंड लाइन, वॉर वेस्टेज रिझर्व्ह आणि ट्रेनिंग अॅम्युनेशन या वर्गवारीत केली जाते. प्रत्येक दारूगोळ्याचे स्वतःचे एक विवक्षित ‘आयुष्य’ असते. ते संपले म्हणजेच ते ‘एक्स्पायर’ झाले की तो दारूगोळा पुलगावच्या दारूगोळा भांडारात पाठविला जातो आणि तेथे नष्ट केला जातो. या कामाचा ठेका दिला जातो. ठेकेदाराकडे दारूगोळा नष्ट करणारे तज्ञ लोक असतात. त्यांच्यासोबतच मदतीला रोजंदारीवरील कामगारही असतात. गेल्या अनेक वर्षांपासून दारूगोळा नष्ट करण्यासाठी हीच पद्धत पुलगावसह इतर अनेक दारूगोळा भांडारे आणि ऑर्डनन्स कारखान्यांमध्ये अवलंबिली जात आहे.

अर्थात असे करताना दारूगोळ्याची हाताळणी अतिशय काळजीपूर्वक करावी लागते. हातातील सामान, भाजीपाला किंवा रेशनच्या गोष्टी हलगर्जीपणाने खाली पडल्या तर त्या फक्त खराब होतात किंवा त्याची मोडतोड होते. मात्र दारूगोळ्याचे तसे नसते. थोडा जरी हलगर्जीपणा झाला की त्याची परिणती फक्त आणि फक्त स्फोटातच होते. दारूगोळा ट्रक्समध्ये किंवा रेल्वेच्या वॅगन्समधे भरताना किंवा त्यातून काढताना अतिशय काळजीपूर्वक हाताळावा लागतो. हीच काळजी दारूगोळा बंकर्समध्ये ठेवताना आणि काढताना घ्यावी लागते. दारूगोळा नष्ट करताना तो एका खड्ड्यात (डिस्ट्रक्शन पिट) ठेवून, बाजूला स्फोटके लावून ‘इग्निशन कॉर्ड’ दूरपर्यंत नेऊन त्याला आग लावण्यात येते. दारूगोळा खड्ड्यात ठेवताना एका विशिष्ट पद्धतीनीच ठेवावा लागतो. त्याच्या आजूबाजूला वाळू भरलेली संरक्षक पोती मोठ्या प्रमाणात ठेवली जातात आणि त्यानंतरच त्याचा स्फोट करण्यात येतो. बंकर्समधून दारूगोळा नेताना ऍम्युनेशन डेपोचा माणूस बरोबर असतो. दारूगोळा खड्ड्यात ठरलेल्या पद्धतीने ठेवण्यासाठी आणि त्याचा स्फोट घडवण्यासाठी तंत्रज्ञांची गरज भासते. जर या ‘चार्जेस’ नीट लावल्या गेल्या नाहीत तर दारूगोळ्याचे स्प्लिंटर्स दूरवर उडू शकतात.

पुलगावमध्ये चार दिवसांपूर्वी झालेल्या स्फोटाचे वृत्तांकन करताना बहुतांश वृत्तवाहिन्यांवर एका नऊ मिलिमीटर रायफल/मशिनगन ऍम्युनेशनचा फोटो दाखवून त्याद्वारे येथे स्फोट झाला असे सांगण्यात येत होते. वास्तविक मशिनगन, रायफल किंवा पिस्तूलचा दारूगोळा खाली पडला म्हणून त्याचा स्फोट होत नाही. स्फोट होण्यासाठी बॉम्ब, ग्रेनेडस् लागतात. तसेच बरेच दिवस साठवणूक केली असल्यामुळे त्यातील दारू ‘अनस्टेबल’ होते आणि तो जरा जरी जोरात खाली पडला किंवा आपटला गेला तर त्याचा स्फोट होऊ शकतो. ज्याप्रमाणे औषधाची डेट एक्स्पायर झाली की ते घेणं मृत्यूला आमंत्रण ठरू शकते तसेच दारूगोळ्याचेही आहे. बरेच दिवस एकाच कंटेनरमध्ये किंवा शेलमध्ये दारूगोळा पडून असला तर त्याची दारू अनस्टेबल होते आणि त्याचा स्फोट होण्यासाठी थोडा दाबदेखील पुरेसा ठरतो. दारूगोळा जेव्हा खाली पडतो तेव्हा निश्चितपणे हलगर्जीपणा झालेला आहे हे समजावे.

दोन वर्षांपूर्वी याच डेपोमध्ये स्फोट झाला असता त्यामुळे घाबरलेल्या गावकऱ्यांना समजावण्यासाठी, त्यांना शांत करण्यासाठी सरकारने पुलगाव ऍम्युनेशन डेपोच्या परिसरातील गावांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. त्याला आता दोन वर्षे होत आली. मात्र अद्याप काहीही हालचाल झालेली नाही. प्रसारमाध्यमांमध्ये याबाबत गावकऱयांनी तीव्र असंतोष व्यक्त केला. आपण हिंदुस्थानी लोक इतिहासापासून कोणताच धडा घेत नाही हे पुलगावमधील ताज्या दुर्घटनेने पुन्हा सिद्ध केले. दुर्घटना घडली की नेते मंडळी आणि प्रशासन आश्वासनांची खैरात करते आणि नंतर पुन्हा एखादी दुर्घटना घडेपर्यंत सर्व काही शांत होते. पुलगावच्या नव्या स्फोटाचीदेखील हीच शोकांतिका आहे. मागील स्फोट दारूगोळ्याचा साठा करण्यातील हलगर्जीपणामुळे झाला होता, तर गेल्या आठवड्यातील स्फोट दारूगोळा हाताळण्यातील हलगर्जीपणामुळे झाला. या दुर्घटनेची आता रीतसर चौकशी होईल, दोषारोपांचा गदारोळ माजेल आणि काही दिवसांनी हा स्फोटदेखील विस्मरणात जाईल. जशी 2016 मध्ये झालेल्या स्फोटाची 2018 च्या स्फोटापर्यंत कोणालाही आठवण नव्हती. आता नव्या स्फोटानंतर तरी पुलगाव दारूगोळा भांडाराच्या सुरक्षिततेच्या बाबत अशी हेळसांड भविष्यात होणार नाही अशी अपेक्षा करूया.

स्फोट नेमका कशाचा?
पुलगावमधील गेल्या आठवड्यातील स्फोट बहुधा हातबॉम्बचा असावा असा माझा अंदाज आहे. कारण प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार या स्फोटात बारा-पंधरा फुटांवरील माणसं मारली गेली. हातबॉम्बची संहारक मर्यादा एवढी मोठी नाही. हातबॉम्बची ‘किलिंग रेडियस’ बारा फुटांची तर डेंजर रेडियस शंभर फुटांची असते. स्फोट जर बॉम्ब, आर्टिलरी शेल, मिसाईलचा झाला असता स्फोटाची तीव्रता आणखी खूप मोठी झाली असती. त्याचे संहारक क्षेत्र मोठे झाले असते आणि त्यांचे मोठमोठे ‘स्प्लिंटर्स’ स्फोटाच्या चहूबाजूला सापडले असते. असे स्प्लिंटर्स मिळाल्याचे वृत्त लेख लिहीपर्यंत तरी नव्हते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असा स्फोट जर खड्ड्यात ठेवलेल्या ऍम्युनेशनच्या साठ्याचा किंवा त्याच्या जवळ झाला असता तर तेथील शेकडो टन वजनाच्या दारूगोळ्याच्या स्फोटाने किती हाहाकार उडाला असता याची कल्पना करणेदेखील अवघड आहे.