भिंती झाल्या सजीव

63

सामना ऑनलाईन । मुंबई

ज्याप्रमाणे आपण आपले घर सुंदर ठेवतो तसा तसंच आपल्या आजूबाजूचा परिसर सुंदर ठेवला तर? नेमका हाच विचार घेऊन कांदिवली (पूर्व) येथील ठाकूर व्हिलेज जवळील रहिवाशांनी आपला परिसर केवळ सुंदरच नाही तर रंगीतही करून टाकला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी येथील रेसिडेंस फोरम, सेव्ह आर्ट आणि मुंबई महापालिका यांच्या प्रयत्नांमुळे या भागात भिंत रंगविण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ६ फूट उंच आणि ३०० फूट लांबी असलेल्या या भिंतीवर इथल्या रहिवाशांची कल्पकता आणि रंगकाम पाहण्याचा मस्त योग जमून आलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पर्यावरणाचे महत्त्व रहिवाशांनी मुंबईकरांना सांगितले.

शनिवारी २ जूनला सकाळी ७ पासूनच या रंगकामाला सुरुवात झाली. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचा आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमात होता. विविध रंगांनी हा परिसर उठून दिसत होता. विविध प्रकारचे सामाजिक संदेश या भिंतीवर लिहिले गेले. इथे दाखल झालेल्या वृत्तमाध्यमांच्या लोकांनाही भिंत रंगवायचा मोह आवरला नाही. वृद्ध महिला पुरुषांनीही फराटे मारायचा आनंद लुटला.

या अभिनव उपक्रमाला येथील रहिवाशांनी मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद दिला. या पुढेही नवनवीन कार्यक्रमांचे येथे आयोजन केले जाईल. लोकांच्या सहभागातून एक वेगळी चळवळ उभी राहील. हा उपक्रम म्हणजे कलेला प्रोत्साहन आहे. कलेमुळे हा परिसर सुंदर होईल. इथली दुनिया रंगीन होईल.

-संदीप श्रीवास्तव, रेसिडेंस फाऊंडेशनचे सदस्य

आपली प्रतिक्रिया द्या