यांना तुम्ही पाहिलंत का?

>> शिरीष कणेकर

मी केवळ ‘झी’ चॅनेलवरच्या मालिका बघतो. असं का? कारण दुसऱया कोणत्या चॅनेल्सवर मालिका असतात व त्या कोणत्या क्रमांकावर लागतात मला माहीत नाही. एवढं सगळं माहीत करून घ्यायचं व चॅनेल लक्षात ठेवायचं हे माझ्या मेंदूला झेपणारे नाही. अधू मेंदूचे फायदेही आहेत. ज्या मालिका संपल्यावर शिव्या देण्यापलीकडे आपण काहीही करत नाही त्या मुळात बघायच्याच कशाला? आहे की नाही लॉजिक अजून जिवंत? ‘शेवटी शेवटी त्याच्याकडे फक्त लॉजिक जिवंत होतं’ असं हे मालिकावाले म्हणू शकतील. त्यांच्याकडे लॉजिक सुरुवातीपासूनच नसतं. तुम्हाला मालिका बघायचीय की लॉजिक बघायला बसलायत?

‘माझ्या नवऱ्याची बायको’मध्ये गुरूच्या म्हणजेच आता राधिकाच्या ऑफिसात रिकाम्या चप्पट फायलींची चळत असते. त्यानंतर ती तीनशे कोटी रुपयांची कंपनी कशी विकत घेते असले फालतू प्रश्न स्वतःला पाडून घेऊ नका. कंपनी काय फायलींनी विकत घेतात; ती तर पैशांनी खरीदतात. राधिकाकडे ‘मोप’ पैसा आहे. तिच्या संपत्तीचे आकडे यू टय़ूबवर वाचायला मिळतात. मी काय म्हणतो, ती कुठूनही आणेल पैसे, तुमच्याकडे तर मागत नाही ना? मग कशाला नसत्या पंचाइती? सौमित्र ज्या लीलया अमेरिकेतून मुंबईला येतो त्या सहजतेने आपण माहीमहून दादरला येऊ शकत नाही. सो व्हॉट? आपल्याला नाही ना त्याचं तिकीट काढावं लागत? त्याच्याकडे विमानाचा पास असेल. तुम्ही गप गुमान बघा की. राधिकेच्या भावाचा मुलगा पाहिजे तेव्हा असतो व नको तेव्हा नसतो. हॉट गोज ऑफ युअर फादर? तुम्हाला नाही ना कोणी ‘बेबी सीटिंग’ करायला लावत? मालिकेला उत्तम ‘टीआरपी रेटिंग’ असलं तर ओळखायचं की बहुसंख्य प्रेक्षकांनी लॉजिक हा विषय घेतलेला नव्हता. टोलेजंग इमारतींचा समूह असलेल्या गुरूच्या सोसायटीची सभा होते तेव्हा जेमतेम दहा-पंधरा रहिवासी हजर असतात. रहिवाशांनी सोसायटीच्या कामात जास्त इंटरेस्ट घ्यायला हवं हाच संदेश मालिका जाता जाता देते.

दहा-पाच मावळ्यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं होतं हे डॉ. अमोल कोल्हे किती प्रभावीपणे दाखवतात नाही? संभाजी झालेले डॉ. कोल्हे मित्र झालेल्या शत्रूच्या छावणीत दिलेर खानची नाडी तपासतील असं वाटत राहतं.

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत सप्तपदी चालताना डॉ. विक्रांत नवरीचा हात हातात घेतो आणि त्याला त्यावरून वधू गरोदर आहे हे कळते. अगं लब्बाडे! आमच्यापासून लपवशील, पण निष्णात डॉक्टरपासून कसं लपवशील? माझ्या मनात आलं की सर्व लग्नात एक-दोन फेऱ्या या डॉ. विक्रांतला मारायला लावाव्यात. ‘स्पेशलायझेशन’ची ही ‘ब्रांच’ अजून म्हणण्यासारखी प्रगत झालेली नाही. ‘माझ्या नवऱयाची बायको’मध्ये एका वडापावला मोताद झालेली (बदललेली) शनाया काही लाखांची मोटारसायकल कुठून आणते हो? शनाया वेगळी आणण्यापेक्षा गुरू नवीनच बाई का ठेवत नाही? नोकरीत नाही आपण वेगळा माणूस नेमत?

‘खुलता कळी खुलेना’मध्ये आई (उषा नाडकर्णी) घरात सर्वेसर्वा असते. अख्खं घर ती प्रेमाच्या व नजरेच्या धाकात ठेवते. संजय मोनेलासुद्धा. म्हणजे बघा, एके दिवशी ती उठून कुठल्याशा अनामिक गावी निघून जाते. घरात राडे होतात, स्फोट होतात, गदारोळ होतो, पण घरात व घरातील माणसांत पूर्णपणें गुंतून गेलेली आई मालिका संपली तरी परत येत नाही. आई कुठं व का गेली हे सांगण्याची जबाबदारी मालिकावाले आपली मानत नाहीत. मालिका संपल्यावर काय, रात गयी बात गयी. पावसाची सर येत-जात राहावी तसा डॉ. विक्रांतचा मनोविकार येत-जात राहतो. माझ्या जिवाला घोर. आता वधू पोटूशी आहे का हे कोण ओळखणार? तरी बरं, नायिका वधू होत नाही पण तिनं गरोदर राहायला काय हरकत होती? मालिकेच्या पुढल्या भागाचं नाव ठेवता आलं असतं – ‘बोला, कोणाचं हे काम?’

‘लागिरं झालं जी’मध्ये अप्पा (शीतलीचा काका हो!) म्हणे दुबईला जातो. म्हणे शीतलीच्या लग्नासाठी पैसे मिळवायला. लग्न होऊन जातं तरी तो परतत नाही की घरी छदाम पाठवत नाही. अहो, कामाचं मानधन मिळालं तर ना तो पैसे पाठवणार ना! दुबईवासी अप्पा पुन्हा दिसण्याची चिन्हे नाहीत. तो तिथंच वैकुंठवासी होणार. त्यावर नाना (शीतलीचा बाप हो!) म्हणणार, ‘तो सगळं बघतोय’. तो म्हणजे प्रेक्षक, देव नव्हे.
‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’मध्ये पाहायला येणारं प्रत्येक स्थळ (त्यातला एक रातांधळा असतो.) नकटीला पसंत असतं. त्या काळात मी चुकून सेटवर गेलो असतो तर तिनं मलाही पसंत केलं असतं. (अय्या आणि इश्श!)

‘तुझं माझं ब्रेक अप’मध्ये एक गुजराथी पात्र (नावं कोणा शिंच्याच्या लक्षात राहतात! त्यातल्या त्यात तरुण बायकांची राहतात.) बरेच एपिसोड खातं. त्यानंतर ते अंतर्धान पावतं. त्याची बायको मात्र कायम माहेरी पडलेली. कोणाला गायब करायचं हे मालिकावाले छापाकाटा करून ठरवितात का? तिखट मिरची अश्विनी जी पॅरिसला जाते ती जातेच. आम्हाला निर्दळायचंच तर चांगल्या जागी निर्दळा अशी शेवटची इच्छा ही पात्रे व्यक्त करीत असावीत.

इतर वाहिन्यांवरच्या मालिका मी बघायला लागलो तर लवकरच मी रस्त्यात (स्वतःचे) कपडे फाडत व (दुसऱयांना) दगड मारत फिरू लागेन. तूर्तास मी या गायब झालेल्या पात्रांची शोधमोहीम हाती घेतोय. सुरुवात ‘आई’ उषा नाडकर्णी हिच्यापासून करतो…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या