
>> शिरिष कणेकर
सोनाली (वृत्तपत्रीय संकेतानुसार नाव बदलले आहे.) ही गृहिणी सतत, अव्याहत, अखंड मोबाईलवर बोलायची. सगळ्या गृहिणींप्रमाणे. तिच्या या मोबाईल आसक्तीवर तिचा नवरा चिडायचा. सगळ्या नवऱ्यांप्रमाणे. नवऱ्याच्या रागाला काडीचीही किंमत न देता ती बिनदिक्कत बोलत राहायची. सगळ्या गृहिणींप्रमाणे. नवरा धुमसत राहिला, त्याचा स्फोट होत राहिला. सगळ्या नवऱयांप्रमाणे.
थोडक्यात, घरोघरी चालतात तसा त्यांचा सुखी संसार चालला होता. ती मोबाईलवर, तो गॅसवर. पुढे घडलेली घटना अतर्क्य होती. आपल्या फोनवरील रंजक संभाषणाला नवऱयानं जोरदार आक्षेप घ्यावा याचा सोनालीच्या मनातील राग तासातासाला वाढत होता. शेवटी एके दिवशी या रागाचा कडेलोट झाला. सुखानं फोनवर बोलू देत नाही म्हणजे काय? तिनं काही काळ फोन चक्क बाजूला ठेवला आणि नवऱयाला गुंगीचं औषध पाजलं (हे गुंगीचं औषधं कुठं मिळतं? ‘‘एक गुंगीचं औषध द्या’’ म्हटलं की, दुकानदार देतो का? साधारण केवढय़ाला पडतं? ते केमिस्टकडे मिळतं की वाण्याकडे?). त्यानंतर तीन मित्रांना बोलावून तिनं नवऱयाचा काटा काढला. स्वहस्ते मंगळसूत्र तोडलं, स्वहस्ते कुंकू पुसलं. नवरा व मोबाईल यातली सोनालीची निवड सुस्पष्ट होती. पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणणारी सावित्री व मोबाईलवर अव्याहत बोलण्यासाठी त्यात येणारा अडथळा सहजगत्या दूर करणारी सोनाली या दोन हिंदुस्थानी स्त्रीरुपातील जमीन अस्मानची तफावत स्तिमित करते. ‘‘वी हॅव कम अ लाँग लाँग वे, बेबी!’’ पती निधन हा कोणेएकेकाळी स्त्रीच्या विश्वाचा अंत होता. सोनालीच्या उदाहरणावरून वाटतं की, पती निधन हा स्त्रीच्या आयुष्यात स्वल्पविरामदेखील नाही. त्यातून पती निधन हे पत्नीनंच घडवून आणलं असेल तर मग बोलायलाच नको. ज्या नातेसंबंधांच्या बळावर आपल्या देशाची मान ताठ व उंच होती, त्यांना मुळातूनच सुरुंग लागलाय. सोनाली ही अपवाद नसून येणाऱया काळाची पावलं आहेत. पोटच्या पोरांना मारणारे आईबाप आढळतायत, तिथं बायकांनी नवऱयाला यमसदनास धाडले तर त्यात नवल ते काय?
आम्ही जुनी माणसं हे नवीन धक्कादायक बदल पाहून रोज हादरतोय. आपण का जिवंत आहोत, कशासाठी जगतोय हेच कळत नाही. मरत नाही म्हणून जगतोय आणि उघडय़ा डोळ्यांनी बघतोय. भ्रष्टाचार हीच जीवन प्रणाली झाल्येय… हॉटेलात जाणं व हॉटेलातून अन्न घरी मागवणं यांनी स्वयंपाकाची जागा घेतल्येय… निर्व्यसनीपणा हा कुचेष्टेचा विषय झालाय… ‘चारित्र्य’ हा शब्द उच्चारणं व अचूक लिहिणं जिकिरीचं होऊन बसलंय… राजकारणात खोटारडेपणा हा मोठा गुणधर्म झालाय… पेट्रोलचे भाव सोन्यासारखे वाढतायत व सोन्याच्या किमती पाहता ते दुकानात नुसते बघायलाही भीती वाटते…कापडापेक्षा शिलाई जास्त झाल्येय… प्रत्येक उशिराचं खापर ट्रफिकवर फोडण्याची फॅशन आलीय… ट्रेननं प्रवास करणं तंदुरुस्तीचं प्रतीक समजलं जातंय… कितीही शिकलं तरी ते कमीच पडतंय… लग्नाचं वय वाढत चाललंय… घोडनवरे व घोडनवऱया यांनाही लग्नाची घाई नसते व ते ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणे पसंत करतात… ‘अच्छे दिन’ येण्याची वाट पाहण्यापेक्षा आहेत त्या दिवसांनाच ‘अच्छे दिन’ म्हणणं सोपं आहे हा शोध जनतेला लागलाय. बापाला बाप न म्हणणारी पिढी जन्माला आलीय… परदेशी जाण्यापेक्षा मध्य रेल्वेवर डोंबिवलीला व पश्चिम रेल्वेवर दहिसरला जाणं कष्टाचं व हालअपेष्टांचं झालंय… मंगळसूत्र घातलंच तर दागिना म्हणून घातलं जातंय… ‘बसू या’ या दोन शब्दांना वेगळाच व एकच अर्थ प्राप्त झालाय. इंग्लिश येतं त्याला सुसंस्कृत समजलं जातंय. कालच्या पोरांना लाख – लाख रुपये पगार मिळतोय व ते वृद्ध आई-बापाची वृद्धाश्रमात रवानगी करतायत. जोडीदारणीला नियमितपणे मारझोड करणे ही नवऱयांची मक्तेदारी राहिलेली नाही… एखादं अंगवस्त्र असणं ही काळाची गरज मानली गेल्येय… सासुरवास संपलाय व ‘सूनवास’ सुरू झालाय… डॉक्टर पैसे कमावणारे यंत्र झालेत… लेखक पाटय़ा टाकतायत व नक्कल करणारे स्वतःला ‘ओरिजनल’ समजतायत… चित्रपटसृष्टीत पूर्वापार अस्तित्वात असलेले ‘कास्टिंग काऊच’ आता सर्वच क्षेत्रांत पसरलेत… निष्पाप बालिकाही लिंगपिसाटांपासून सुटत नाहीत… कलियुगातलाही सगळ्यात खडतर कालखंड सुरू आहे…
मोबाईलनं एक अनिष्ट ‘कल्चर’ आणलंय. बोलणं म्हणजे मोबाईलवर बोलणं असा सार्वजनिक समज पसरलाय. घरीदारी, कार्यालयात, रस्त्यात, बागेत, बसमध्ये, किंबहुना कुठेही माणसं आपली मोबाईलवर बोलत असतात. इतकं आसूसून काय बोलत असतात देव जाणे. गंमत म्हणजे इतकं संभाषण करूनही माणसामाणसांतला संवाद दिवसेंदिवस हरवत चाललाय.
मीदेखील अलीकडे बाहेरच्या खोलीतून आतल्या खोलीत काही सांगायचं असेल तर ‘मेसेज’ किंवा ‘व्हॉटस् अॅप’ करतो. थेट संवाद नको, ठिणगी पडायला नको, भडका उडायला नको. सारं कसं शांत शांत!
तिच्या तासन्तास मोबाईलवरून बोलण्याला मी चुकूनही आक्षेप घेत नाही. मला माझा जीव प्यारा आहे. चहाही माझा मीच करून घेतो. काय माहीत, कशात गुंगीचं औषध घालतील…




























































