
>>द्वारकानाथ संझगिरी
पब, विशेषतः ब्रिटिश पब ही एका लेखात वगैरे मावणारी गोष्ट नाही. हजार वर्षांची परंपरा कशी काय थोडक्यात लिहायची? विशेषतः पबबद्दल प्रेम असताना? मुंबईतली इराणी हॉटेल्स खूप कमी झाल्याचं मला नेहमी वाईट वाटतं. आमच्या तारुण्याच्या भावविश्वाचा तो भाग होता. तो आमच्यासाठी मद्य नसलेला पब होता. मित्रांना भेटण्याची जागा. सिनेमा-राजकारण, क्रिकेट, नाटक, साहित्य या विषयांवर मित्रांबरोबर वाद घालण्याची जागा. कधीतरी एकत्रितपणे क्रिकेट कॉमेण्ट्री ऐकण्याची जागा. सोबतीला सिगारेट आणि कटिंग चहा! कुणाचा खिसा भरला असेल तर बन किंवा ब्रुन मस्का! इंग्लिश पब हा असाच आहे. जास्त पॉश! घरी चहा मिळत नव्हता म्हणून काही आम्ही इराण्यात जात नव्हतो. पबचं तसंच आहे. बीअर हे निमित्त. गप्पा, भेटीगाठी, वाद, फुटबॉलची मॅच टीव्हीवर पाहणं, जल्लोष करणं आणि आठवडय़ाचा शेवट सत्कारणी लावणं हा मूळ उद्देश.
वर्षापूर्वी ब्रिटिश पबवरचा बीबीसीचा एक रिपोर्ट वाचून मी नर्व्हस झालो होतो. 2000 सालानंतर इंग्लंडमध्ये सतरा टक्के म्हणजे दहा हजार पाचशे पब कमी झाले. उगाच माझा बँक बॅलन्स कमी झाल्यासारखं दुःख मला झालं! तरीही आज ब्रिटिश भूमीत साठ हजार पब आहेत. त्यापैकी 53 हजार इंग्लंड आणि वेल्समध्ये, 5200 स्कॉटलंडमध्ये आणि 1600 नॉर्दर्न आयर्लंडमध्ये.
बरं, कारण काय? अनेक कारणं त्या रिपोर्टमध्ये दिली होती. पॉइंटवर (एक मद्याचं माप) टॅक्स वाढवले होते. पबमध्ये सिगारेट ओढायला मनाई केली गेली. जेवणाचे भाव वाढले वगैरे तर होतेच! त्यामुळे सुपर मार्केटमध्ये मिळणाऱया स्वस्त बीअरचा खप सत्तावीस टक्क्यांनी वाढला, पण घरी बीअर पिणे आणि पबमध्ये बीअर पिणे यात टीव्हीवर मॅच पाहणे आणि लॉर्डस्वर जाऊन मॅच पाहणे इतका फरक आहे. ते वातावरण कुठून आणणार? वातावरणासाठी चार पैसे खर्च करायला नको का? पण त्यांची आणखी पाहणी धक्कादायक होती.
15-24 या गटातले सत्तावीस टक्के तरुण-तरुणी म्हणे ‘अपेयपान’ करीत नाहीत. मी डोळे चोळले. केवळ बीबीसी अतिरंजित बातम्या देत नाही म्हणून मी त्यावर विश्वास ठेवला. कारण तिथे मी तरुण-तरुणींना शुक्रवारी-शनिवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत पाहिलंय. ‘‘कुणाच्या मिठीत कुणाचे ओझे’’ असा प्रकार असतो. अनेक काचा फुटलेल्या असतात.
अरे हो, आणखी एक कारण दिलं गेलं होतं. जीन आणि क्राफ्ट बीअरकडे त्यांचा ओढा वाढलाय. क्राफ्ट बीअर मीसुद्धा अजून घेतलेली नाही. बाजरी, मका, तांदूळ वगैरेची असते. त्यात बार्ली नसते. त्याच्या वेगळय़ा ब्रुअरीज असतात. हे सर्व पब कुठल्या ना कुठल्या ब्रुअरीच्या मालकीचे असतात, पण ते इतर वेगवेगळय़ा बीअरही विकतात. त्यामुळे क्राफ्ट बीअर ही दुखरी नस असू शकत नाही. एकेकाळी मी ब्रिटिश माणसाला इंग्लिश बीअर म्हणजे कडवट, गडद रंगाची बीअर पिताना जास्त पाहिलंय. आपण म्हणजे मी जी लाईट बीअर पितो, तिला ते लागर म्हणतात.
पबचा ऱहास होणं म्हणजे टिपीकल ब्रिटिश संस्कृतीचा ऱहास होणं. केवढी पुरातन ती परंपरा! किती उदात्त परंपरा! त्यांनी कधी बीअर किंवा एकंदरीतच मद्याला ‘अपेय’ वगैरे म्हटलेलं नाही. फायटिंग कॉक्स हा हर्टशायरमधला एक पब इ.स. 1100 सालातल्या इमारतीत आहे. तिथे बऱयाचदा इमारती म्हाताऱया होत नाहीत. त्यांना तरुण ठेवलं जातं. आपल्याकडे बऱयाच इमारती तारुण्य काय, बालपणातच म्हाताऱया होतात.
त्यांची नावं पण काय मस्त असतात! द चेकर्स, द व्हाईट स्वॉन, द किंग्ज आर्म्स, द रेड लायन, द व्हाईट हॉर्स. तिथे माणसं पत्ता सांगताना पबला ‘लॅण्डमार्क’ मानून पत्ता सांगतात. म्हणजे ‘‘द व्हाईट हॉर्सच्या पबच्या पुढच्या गल्लीत जा’’ वगैरे! आणि काय काय परंपरा असतात त्यांच्या! जर पबजवळच्या चर्चचे नाव ‘सेंट मेरीज’ असेल तर पबचं नाव ‘द स्टार’ असतं. मला त्यांची एक संस्कृती आवडते. त्यांचं ‘पब हॉपिंग’ आणि ‘शिपाई शिपाई’ कॉन्ट्रिब्युशन आवडतं. म्हणजे सोल्जर्स कॉन्ट्रिब्युशनल पब हॉपिंगमध्ये एकीकडे बीअर आणि वातावरणाची चव घेतली की, पुढे दुसऱया पबमध्ये जायचं आणि ‘शिपाई शिपाई’ वृत्ती. म्हणजे समजा आपण चार जण गेलो आणि सर्वांसाठी पहिलं ‘ड्रिंक’ मी घेतलं तर पुढचं दुसऱयानं घ्यायचं. तिसरं तिसऱयानं वगैरे! बरं, त्यांचं पिणं म्हणजे चखणा बख्खळ आणि पिणं घोटभर असं नसतं. चखणा अगदी मर्यादित आणि मग फिश ऍण्ड चिप्स वगैरे! मी पबमध्ये तरुण पिढी फक्त पितानाच पाहिली आहे.
मला इंग्लंडमध्ये मद्य कुणी प्यावं याबद्दलचे नियम अत्यंत रंजक वाटतात. मी ते एके ठिकाणी वाचले आणि दिग्मूढ झालो. ऐका तर…
1) पाच वर्षांखालील बालकाला मद्य देणं वर्ज्य. अपवाद, आणीबाणीच्या परिस्थितीत वैद्यकीय गरज लागली तर ते द्यावे. अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्याने. दारू जीव घेते ठाऊक होते, दारू जीव वाचवते याची मला कल्पना नव्हती.
2) पाच वर्षांवरील मुलाला सणासुदीला पालकांच्या नजरेखाली ‘एकच प्याला’ देता येतो. अर्थात फक्त घरी. आम्हाला लहानपणी ‘चहा वाईट’ हेसुद्धा सांगितलं गेलंय.
अठरा वर्षांखालील मुलाला किंवा मुलीला मद्य सर्व्ह केले जाऊ नये असा नियम आहे, पण तो वा ती एकटं असताना.
पण एखादा मुलगा, मुलगी 16-17 वर्षांची असेल आणि ती जर जेवायला एखाद्या 18 वर्षांवरील व्यक्तीबरोबर आली असेल तर त्या व्यक्तीला 16-17 वर्षांच्या मुला-मुलींसाठी एक ग्लास बीअर, सायडर किंवा वाईन घेता येते. बार टेंडरला वयाचा संशय आला तर तो वयाचं प्रमाणपत्र मागू शकतो.
पब ही सामाजिक मीलनाची जागा आहे. याचं आणखी एक प्रतीक म्हणजे एखादं गिऱहाईक तर्र असेल तर त्याला मद्य विकणं हा गुन्हा आहे आणि एखाद्या पबचं जेवण तुम्हाला आवडलं तर लहान मुलासह तुम्ही त्याचा रात्री उशिरापर्यंत आस्वाद घेऊ शकता. तरीही पबला मी रेस्टॉरंट आणि बार म्हणणार नाही. कारण तसं म्हणणं म्हणजे मैत्रिणीला बायको म्हणण्यासारखं आहे. ‘पब’ ही मैत्रीण असते.


























































