बहुरंगी.. बहुढंगी आंबा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हापूस पायरीव्यतिरिक्त इतर आंब्यांचा मोसम आता जूनमध्ये खऱ्या अर्थाने सुरु होईल. हिंदुस्थानात सुमारे आंब्याच्या १५०० जाती आढळतात आणि प्रत्येक जातीची चव, आकार आणि रंग वेगळा आहे. आंब्यांच्या अशाच काही प्रसिद्ध जातींबद्दल जाणून घेऊया. प्रत्येक जातीची चव, आकार आणि रंग वेगळा आहे. गुलाबी लाल असा गुलाब खास किंवा सिंधुरा, पोपट चोचीच्या आकाराच्या तोतापुरी, तसेच बिहारमधील मालदा ज्याचा एक अनोखा सुगंध आहे. अशा आंब्याच्या अनोख्या जाती बाजारपेठांवर जून ते ऑगस्ट या कालावधीत राज्य करतात.

1) तोतापुरी
चवीला सौम्य आणि हिरवट रंगाचा हा आंबा पोपटाच्या चोचीसारखा दिसतो. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातील, हा आंबा असाच खाण्यासोबतच तो सलाड आणि लोणच्यासाठीही उत्तम आहे.
कसे ओळखावे: पिकल्यावर आंबा हिरवट रंगाचा असतो आणि पोपटाच्या चोचीसारखे दिसतो.

2) सिंधूरा
या आंब्याची चव आंबट-गोड असून याची चव तुमच्या तोंडात बराच काळ रेंगाळेल. शेक तयार करण्यासाठी हा खूप चांगला आहे, कारण याचा गर छान पिवळ्या रंगाचा असतो.
कसे ओळखावे- हा आंबा दिसायला वेगळा असून त्याची साल बाहेरून लाल आणि पिवळी असते.

3) बंगनापल्ली
हापूस आंब्यापेक्षा आकाराने मोठ्या असलेल्या या आंब्याच्या जातीचे उत्पादन आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील बानागनपल्ले येथे केले जाते. त्याचा सुगंध खूप मोहक असून, तो गुळगुळीत सालीसह अंडाकृती आकाराचा असतो आणि त्यांची लांबी सुमारे १४ सेमी असते.
कसे ओळखावे- त्याची साल पिवळसर रंगाची असून त्यावर काही डाग असतात आणि फळ अंडाकृती आकाराचे असते.

4) चौसा
उत्तर हिंदुस्थान आणि बिहारमध्ये ही लोकप्रिय जात शेरशाह सूरीने सोळाव्या शतकात त्याच्या कारकिर्दीत आणली होती. ह्या जातीला बिहारमधील एका शहराचे नाव दिले गेले आहे. हा आंबा पिवळ्या-सोनेरी रंगाचा असतो.
कसे ओळखावे: त्याच्या पिवळ्या-सोनेरी रंगाने सहज ओळखता येते.

5) रासपुरी
कर्नाटकातील जुने म्हैसूर येथे मोठ्या प्रमाणावर पिकवली जाणारी ही जात हिंदुस्थानात आंब्याची राणी म्हणून ओळखली जाते. ही मे महिन्यात येते आणि जूनच्या अखेरीस बाजारात उपलब्ध होते. दही, स्मूदी आणि जाममध्ये ह्याचा उत्तम वापर केला जातो.
कसे ओळखावे- ते अंडाकृती आकाराचे आणि सुमारे ४ ते ६ इंच लांब असतात.

6) हिमसागर
गोड सुगंध आणि पश्चिम बंगाल, ओरिसाची खासियत असलेलं हे फळ मध्यम आकाराचे असून त्याचे वजन २५०-३५० ग्रॅम दरम्यान असते आणि हे डेझर्ट आणि शेक बनवण्यासाठी वापरले जाते.
कसे ओळखावे- मध्यम आकाराचे, पिवळ्या सालीसह हिरव्या रंगाचे असतात.

7) नीलम
ही जात देशाच्या प्रत्येक भागात पिकवली जाते. सामान्यतः जूनमध्ये भरपूर प्रमाणात आढळते. नारिंगी सालीसह, हे इतर जातींच्या तुलनेत लहान असतात.
कसे ओळखावे- त्यांची साल केशरी असते आणि आंब्याच्या इतर जातींच्या तुलनेत आकाराने लहान असते.

8) मालगोवा
मालगोआ हा एक गोल आंबा आहे ज्यावर पिवळ्या छटासह हिरवा रंग असतो. त्याचा आकार तिरकस गोलाकार असतो, गर हलका पिवळा असतो आणि हे आंबे बहुतेक जूनमध्ये उपलब्ध होतात.
कसे ओळखावे: ३००-५०० ग्रॅम वजनाचा लहान तिरकस गोलाकार

9) मालदा
बिहारमधील ‘आंब्याचा राजा’ म्हणून ओळखले जाणारा मालदा आंबा चवीला गोड-आंबट असून तो रसाळ आणि स्वादिष्ट आहे.
कसे ओळखावे: इतर प्रकारच्या आंब्यांच्या तुलनेत त्याचे आवरण पातळ असते आणि त्याला गोड सुगंध असतो.

10) लंगडा
लंगडा हा आंब्याची एक प्रसिद्ध जात आहे, जिचा जन्म उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला आहे. पाय नसलेल्या माणसाच्या शेतात पहिल्यांदा त्याची लागवड केली गेली होती, म्हणून या आंब्याच्या जातीला लंगडा म्हणतात. ते जुलै ते ऑगस्टपर्यंत बाजारात उपलब्ध होतात.
कसे ओळखावे- अंडाकृती आकाराचे असून ते पिकलेले असतानाही हिरव्या रंगाचे असतात.

11) केसर
सर्वात महागड्या जातींपैकी एक जात. आंबाच्या रंग केशरसारखा दिसतो, त्याच केशरी रंगावरून त्याला हे नाव देण्यात आले. हे मुख्यतः अहमदाबाद, गुजरातमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात पिकवले जातत. या जातीची लागवड जुनागढच्या नवाबांनी १९३१ मध्ये प्रथम केली आणि १९३४ मध्ये त्याचे नाव केसर ठेवण्यात आले.
कसे ओळखावे: त्याचा वास केसरसारखा आहे जे त्याचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य आहे.

12) बदामी
बदामी ही कर्नाटकातील आघाडीची आंब्याची जात असून एप्रिल ते जुलै या कालावधीत हा आंबा बाजारात येतो. पोषक तत्वांनी भरलेल्या या जातीची साल अतिशय पातळ असते आणि हा आंबा कर्नाटक राज्यात प्रसिद्ध आहे.
कसे ओळखावे- या जातीच्या सालीला चमकदार सोनेरी पिवळा लाल रंगाची छटा असते जी फळाच्या वरच्या बाजूला पसरते.