डेंग्यू-मलेरिया नियंत्रणासाठी ‘कोंबिंग ऑपरेशन’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

डेंग्यू-मलेरियाच्या नियंत्रणासाठी पालिकेने धारावीमध्ये ‘कोम्बिंग ऑपरेशन’ सुरू केले आहे. यामध्ये ५२ कर्मचार्‍यांची टीम तैनात करण्यात आली असून पहिल्याच दिवशी तब्बल ६६ डास उत्पत्तीस्थाने उद्ध्वस्त करण्यात आली. ३ ऑगस्टपर्यंत हे ‘कोम्बिंग ऑपरेशन’ सुरू राहणार आहे.

पावसाळ्याच्या मध्यावर मुंबईत डेंग्यू-मलेरियाचे रुग्ण वाढतात. यामध्ये धारावीमध्ये अशा रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.  या पार्श्वभूमीवर पालिकेच्या कीटक नियंत्रण खात्याने धारावी परिसरातील डास उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ सुरू केले आहे. धूर फवारणी, औषध फवारणीसह डास निर्माण होणारी ठिकाणे नष्ट केली जात आहेत. यामध्ये ‘कोम्बिंग ऑपरेशन’च्या पहिल्याच दिवशी ३ हजार ५८४ संभाव्य डास उत्पत्तीस्थाने तपासण्यात आली. यातील ६६ ठिकाणी डेंग्यू व हिवताप पसरविणार्‍या डासांची उत्पत्ती आढळून आल्याचे  कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी सांगितले. साचलेल्या चमचाभर पाण्यातही डेंग्यू-मलेरियाचे डास अंडी घालून आजारांसाठी कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे पाणी साचू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी मुंबईकरांना केले आहे.

पहिल्याच दिवशी ३ हजार ३५४ घरांची पाहणी

‘कोम्बिंग ऑपरेशन’च्या पहिल्याच दिवशी ३ हजार ३५४ घरांच्या पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान ३ हजार ५८४ डास संभाव्य उत्पत्तीस्थळे तपासण्यात आली. यापैकी ६५ ठिकाणी डेंग्यू पसरविणार्‍या ‘एडिस’ डासांची उत्पत्ती आढळून आली, तर एका ठिकाणी हिवतापास कारणीभूत ठरणार्‍या ‘ऍनाफिलीस’ डासांची उत्पत्ती आढळून आली. ही डास उत्पत्तीस्थाने  पाण्याचे ड्रम, ‘बॉक्स ग्रील’मधील अडगळीच्या वस्तू, ताडपत्री, पन्हाळी, टायर, थर्माकोलमध्ये साचलेल्या पाण्यात आढळून आली.

असे आहे कोम्बिंग ऑपरेशन

  • धारावीच्या गल्लीबोळात कार्यवाही करण्यासाठी ५२ कर्मचार्‍यांच्या नऊ टीम तयार करण्यात आल्या असून यात १२ वरिष्ठ कर्मचारी आणि ४० कामगारांचाही समावेश आहे.
  • प्रत्येक चमूत ३ ते ५ सदस्य असून ते धारावीतील घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधून नागरिकांना डास नियंत्रणाचे महत्त्व पटकून देत आहेत.
  • यामध्ये घरातील सदस्यांसमवेत घरातील कानाकोपरा शोधून त्यांना डास उत्पत्तीस्थळे कशी शोधावीत व ही स्थळे तयार होऊ नयेत यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शन करीत आहेत.