
समाजाने अव्हेरलेल्या तृतीयपंथीयांना सन्मानाने जगण्याची संधी देत छत्तीसगढ पोलिसांनी स्तुत्य निर्णय घेतला आहे. छत्तीसगढ सरकारने पोलीस दलात कॉन्स्टेबलपदी 13 किन्नरांची नियुक्ती केली आहे. या उमेदवारांची योग्यता तपासून आणि अन्य निकषांचे पालन करीत त्यांना पोलीस म्हणून भरती करण्यात आले आहे. यातील आठजण रायपूर जिल्ह्याचे तर दोघे राजनांदगाव जिल्ह्याचे आहेत. कोरबा, सरगुजा आणि बिलासपूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका किन्नराला कॉन्स्टेबल म्हणून पोलीस दलात नियुक्त करण्यात आले आहे. आम्हीही तुमच्यासारखी हाडामांसाची माणसे आहोत. समाजाने तृतीयपंथी समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, असे आवाहन करताना कॉन्स्टेबल सोनिया हिने किन्नरांना मानाने नोकरी देऊन सामाजिक परिवर्तन घडवणाऱ्या छत्तीसगढ पोलिसांचे आपल्या समाजाच्या वतीने हार्दिक आभार मानले.


























































