नव्या नोटा अंधांनाच काय, धडधाकट व्यक्तींनाही पटकन ओळखता येत नाहीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bombay-high-court-1

सामना प्रतिनिधी । मुंबई

अंध व्यक्तींनाच काय धडधाकट व्यक्तींनाही नव्या चलनी नोटा चटकन ओळखता येत नाहीत, अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी केली आहे. अंध व्यक्तींना चलनातील नोटा ओळखता याव्यात यासाठी रिझर्व्ह बँकेने मोबाईल ऑप्लिकेशन तयार केले, परंतु हे ऍप 100 आणि 50 रुपयांच्या जुन्या नोटा ओळखण्यात अपयशी ठरत आहेत. हायकोर्टाने याची दखल घेऊन या ऍपमधील त्रुटी विचारात घेता त्यावर तोडगा काढण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेला दिले.

चलनातील नव्या नोटा अंध व्यक्तींना स्पर्शाने ओळखता याव्यात, यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची मागणी ‘नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड’ या संस्थेने हायकोर्टात जनहित याचिका दाखल करून केली आहे. याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती एन. एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी या मोबाईल ऍपमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. उदय वारुंजीकर यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.

  • खंडपीठासमोर एका अंध व्यक्तीला हे ऍप हाताळण्यास देण्यात आले त्यावेळी हे ऍप नोटा ओळखण्यास अपयशी ठरत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. तसेच विकसित करण्यात आलेली काही ऍपही इंटरनेटवर चालणारी असून प्रत्येक नेत्रहीन व्यक्तीला ते वापरता येईलच असे नाही असे याचिकाकर्त्यानी कोर्टाला सांगितले.
  • एखादी अंध व्यक्ती प्रवास करत असताना या ऍपचा वापर योग्यप्रकारे होत नसून कमीअधिक प्रकाशात हे ऍप काम करत नसल्याची माहितीही त्यांनी न्यायालयाला दिली. पुढील सुनावणी 6 जुलैपर्यंत तहकूब केली.