भोपाळी नागरिकांबाबत आक्षेपार्ह विधान, विवेक अग्निहोत्रींविरोधात पोलिसांत तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vivek-agnihotri

भोपाळी शब्दाचा अर्थ होमोसेक्शुअल असे ‘कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केलेले विधान वादात सापडले आहे. अशा प्रकारे आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अग्निहोत्री यांच्याविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे.  अग्निहोत्री यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्री यांनी भोपाळमध्ये एका वेबसाईटला मुलाखत देतेवेळी भोपाळी शब्दाचा अर्थ म्हणजे होमोसेक्शुअल असे वादग्रस्त विधान केले होते. त्याविरोधात पत्रकार आणि सेलिब्रिटींचे व्यवस्थापक रोहित पांडये यांनी वकील अली काशिफ खान देशमुख यांच्या माध्यमातून विवेक अग्निहोत्री यांच्याविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. प्रमोशनच्या नावाखाली वाद निर्माण करून अग्निहोत्री यांना ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटामधून नफा कमवायचा आहे. म्हणूनच अग्निहोत्री यांनी भोपाळी लोकांबाबत असे आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. भोपाळचा रहिवासी असल्याने अग्निहोत्री यांच्या विधानामुळे मनस्ताप झाला असून भोपाळची बदनामी करणाऱ्या अग्निहोत्री यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करावी, असे पांडये यांनी तक्रारीत म्हटले आहे.