
देशाच्या स्वातंत्र्य लढय़ाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱया अभिनेत्री कंगना राणावतच्या विरोधात मुंबईसह राज्यभरात पोलीस तक्रारी दाखल झाल्या आहेत. मुंबईत मलबार हिल पोलीस ठाणे व साकीनाका पोलीस ठाण्यात काँग्रेसतर्फे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तर प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारावर एफआयआर दाखल करून कंगनाला तत्काळ अटक करण्याची मागणी कुणाल राऊत यांनी केली आहे. कंगनाच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे ते म्हणाले. कंगना राणावतचा पद्मश्री पुरस्कारही परत घ्यावा, अशी मागणी नसीम खान यांनी केली आहे.
मिरज शहर पोलिसात तक्रार
कंगना राणावतविरोधात मिरज शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी यांनी ही तक्रार दिली आहे. कंगना राणावतने केलेले वक्तव्य देशद्रोही आहे. त्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच हा देश देशद्रोह करणाऱया व्यक्तींना क्षमा करत नाही, हे सर्वांना दाखवून द्यावे, असे निवेदन सूर्यवंशी यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात दिले आहे.


























































