
खासगी डॉक्टरांकडे आलेल्या रुग्णामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळल्यास त्याला मोफत कोविड टेस्टसाठी पालिकेच्या सेंटरवर पाठवा, असे सक्त निर्देश पालिकेने खासगी डॉक्टरांना दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. मोफत कोरोना टेस्टसाठी मुंबईभरात पालिकेची 266 टेस्ट सेंटरची सुविधा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत कोरोनाची तिसरी लाट पूर्ण आटोक्यात आली असली तरी अमेरिका, चीनसह काही युरोपीय देशांमध्ये कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. त्यामुळे काही देशांत पुन्हा लॉकडाऊनसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पालिकेनेही खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत दररोज सुमारे दहा हजारांवर कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. यामध्ये आठवडाभरापासून सुमारे 70 ते 100 रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांचे क्लोज काँटॅक्ट आणि हायरिस्क काँटॅक्टची चाचणी अनिवार्यपणे करण्यात येत आहे, मात्र कोरोना नियंत्रणात असल्याचे वातावरण असल्याने खासगी डॉक्टरांकडे येणारे रुग्ण चाचणीकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांसोबत पालिकेने नुकतीच एक महत्त्वाची बैठक घेतली. या वेळी लक्षणे असलेल्या रुग्णांना सक्तीने ‘आरटी-पीसीआर’ चाचणी करण्यास सांगावे किंवा पालिकेच्या मोफत केंद्रावर कोविड चाचणी करण्यासाठी पाठवावे असे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबईत बाधित आढळणाऱ्या रुग्णांवर सात दिवस काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येत आहे. हे रुग्ण सात ते दहा दिवसांत कोरोनामुक्तही होत आहेत. शिवाय आढळणाऱ्या रुग्णांमध्ये लक्षणे नसण्याचे प्रमाणही सर्वाधिक आहे. त्यामुळे मुंबईसाठी काळजीचे कारण नसले तरी खबरदारी घ्यावी.
सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त
मुंबईची कोरोना स्थिती
– मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कोरोना चाचण्या करण्यात येत होत्या.
– मात्र रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे टप्प्याटप्प्याने शेकडो कोरोना चाचणी केंद्रे वाढवण्यात आली. खासगी प्रयोगशाळांनाही चाचणीची परवानगी देण्यात आली.
– सद्यस्थितीतही पालिकेच्या 266 केंद्रांवर मोफत चाचणी होत आहे. आतापर्यंत पालिका आणि खासगी मिळून 1 कोटी 68 लाख 35 हजार 488 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
– यामध्ये 10 लाख 59 हजार 213 बाधित आढळले आहेत, तर 19 हजार 562 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 10 लाख 39 हजार 148 जणांनी कोरोनावर मात केली आहे.


































































