कॉम्प्युटर बाबांमुळे मध्यप्रदेशातील शिवराज सरकारच्या अडचणी वाढल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्य प्रदेश सरकारने पाच संतांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला होता. मात्र, त्या पाच संतापैकी एका नाराज संतामुळे शिवराज सिंह सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजप सरकारच्या कार्यपद्धतीमुळे नाराज झालेल्या कॉम्प्युटरबाबांनी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तसेच आता त्यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना आव्हान दिले आहे. कॉम्प्युटर बाबा संत समागम घेऊन शिवराज सिंह यांच्यावर निशाणा साधणार आहे. कॉम्प्युटरबाबा मंगळवारी इंदूरमधून या अभियानाची सुरुवात करणार आहे. ३० ऑक्टोबरला ग्वाल्हेर, ४ नोव्हेंबरला खांडवा, ११ नोव्हेंबरला रीवा आणि २३ नोव्हेंबरला जबलपूरमध्ये कॉम्प्युटरबाबा संत समागम घेऊन शिवराज सरकारविरोधात मोहीम राबवणार आहेत. त्यामुळे कॉम्प्युटरबाबांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.

संत समागमामध्ये कॉम्प्युटरबाबा नर्मदा स्वच्छता, अवैध उत्खनन आणि गोरक्षा याबाबत चर्चा करणार आहेत. तसेच या सर्व आघाड्यांवर शिवराजसिंह सरकार कसे अपयशी ठरले आहे, याबाबत कॉम्प्युटरबाबा माहिती देणार आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉम्प्युटरबाबांनी भाजपविरोधात मोर्चा उघडल्याने भाजप सरकारची अडचण होणार आहे. कॉम्प्युटरबाबांनी त्यांची भाजपविरोधातील मोहीम मागे घ्यावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी इतर संताना ते कॉम्प्युटरबाबांकडे पाठवून त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न करणार आहे. जूनापीठचे पीठाधीश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांना कॉम्प्युटरबाबांकडे पाठवणार आहे.

शिवराज सिंह सरकारने धर्माची आणि साधू संताची उपेक्षा केल्याचा कॉम्प्युटरबाबांचा आरोप आहे. सरकारने गो मंत्रालय उभारण्याची घोषणा केली होती. त्याबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच नर्मदा शुद्धीकरणासाठी सरकारने वेगळे मंत्रालय स्थापन करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. दोन वर्षापूर्वी सिंहस्थादरम्यान मध्य प्रदेश सरकारने केलेल्या तयारीबाबतची पोलखोल कॉम्प्युटरबाबांनी केली होती. सिंहस्थादरम्यान राज्य सरकारने केलेला भ्रष्टाचार त्यांनी उज्जैनपासून दिल्लीपर्यंत उघड केला होता. ऐन निवडणुकांच्या तोंडावर कॉम्प्युटरबाबांच्या भूमिकेमुळे भाजपची अडचण झाली आहे.