
सामना प्रतिनिधी, मुंबई
शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुनयना पोतनीस यांच्या अकाली निधनाने वाकोला, सांताक्रुझ परिसरातील मायेचा झरा आटला, अशा शब्दांत आज सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली. शिवसैनिक असो की सर्वसामान्य कुटुंबातील महिला असो, प्रत्येकाच्या मदतीला सुनयना पोतनीस माऊलीच्या रूपाने धावून जात असल्याचे अनेकांनी सांगितले.
सुनयना पोतनीस यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज विभाग क्रमांक 6 मधील शिवसेना पदाधिकाऱयांनी वाकोला येथील पाटक कॉलेजमध्ये श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. शिवसेना विभागप्रमुख-आमदार संजय पोतनीस यांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत सुनयना पोतनीस यांचा पत्नी म्हणून सिंहाचा वाटा असल्याचे मान्यवरांनी सांगितले. यावेळी आमदार संजय पोतनीस, मुलगा यश आणि क्रिकेटपटू पृथ्वी शॉ यांचे सांत्वन केले.
या श्रद्धांजली सभेला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ऍड. लीलाधर डाके, खासदार गजानन कीर्तिकर, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, सूरज देसाई, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, विभागप्रमुख-आमदार ऍड. अनिल परब, मंगेश कुडाळकर, माजी खासदार मोहन रावले, माजी आमदार कृपाशंकर सिंह, अभिराम सिंह, गुरुनाथ देसाई, रिपाइंचे सिद्धार्थ कांबळे उपस्थित होते.
नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान
सुनयना पोतनीस यांनी तीन वर्षांपूर्वी अवयवदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांच्या निधनानंतर त्यांचे नेत्रदान करण्यात आले. त्याचेही उपस्थितांनी कौतुक करून नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचा संदेश सुनयना यांनी दिल्याचे सांगितले.
शुक्रवारी दशक्रिया विधी
सुनयना पोतनीस यांचा दशक्रिया विधी शुक्रवार, 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता शिवाजी पार्क, दादर येथे करण्यात येणार आहे, तर बारावे 11 नोव्हेंबर रोजी राहत्या घरी वाकोला येथे होणार आहे.
summary- condolence for late sunaina potnis




























































