
दिवाळीच्या सुट्टीविषयी शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या सूचनांमुळे शाळा आणि पालकांचा पुरता गोंधळ उडाला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी शालेय शिक्षण विभागाचे परिपत्रक ट्विट करून उद्या म्हणजेच 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी असल्याचे जाहीर केले आहे. मात्र काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाकडूनच राज्यातील शाळांना दिवाळीसाठी 1 ते 20 नोव्हेंबर अशी 20 दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे.
21 नोव्हेंबरला रविवार असल्यामुळे 22 नोव्हेंबरपासून शाळा पुन्हा सुरू होणार आहेत. सुट्टय़ांबाबतच्या या दोन वेगवेगळ्या सूचनांमुळे शाळांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून दिवाळीची सुट्टी नेमकी कधीपासून सुरू होणार, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. त्यातच शिक्षणमंत्र्यांकडून सुट्टीच्या एक दिवस आधी शिक्षण विभागाचे दिवाळी सुट्टीविषयीचे परिपत्रक ट्विट करण्यात आले आहे. बहुसंख्य शाळांमध्ये 30 ऑक्टोबरपर्यंत सहामाही परीक्षा सुरू असल्याने 28 ऑक्टोबरपासून दिवाळीची सुट्टी देणे शाळांना शक्य नसल्याचे दिसत आहे.
गेल्या आठवडय़ात मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण निरीक्षक कार्यालयामार्फत शाळांना 1 ते 20 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सुट्टीनुसार शाळांनी 30 ऑक्टोबरपर्यंत सहामाही परीक्षेचे नियोजन केले आहे. अद्याप अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा सुरू असून शहरी भागात आठवी ते बारावी तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहून परीक्षा देत आहेत. त्यातच बुधवारी शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक जाहीर करून उद्या गुरुवार, 28 ऑक्टोबरपासून दिवाळीची सुट्टी असल्याचे जाहीर केले आहे.
हे परिपत्रक ट्विट करीत वर्षा गायकवाड यांनी दिवाळी सुट्टी काळात शाळांकडून सुरू असलेले ऑनलाइन वर्ग बंद राहतील, असे स्पष्ट करून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शिक्षण विभागातील निर्णय अधिकाऱ्यांना माहिती नाही
शिक्षण विभागातील खालच्या अधिकाऱयांनी घेतलेले निर्णय वरच्या अधिकाऱयांना माहीत कसे नाहीत, असा सवाल शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी उपस्थित केला. दिवाळी सुट्टीच्या नव्या परिपत्रकामुळे शाळांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. अनेक शाळांची उद्यापासून सुट्टी जाहीर करण्याची तयारी नाही. काही शाळांमध्ये परीक्षा सुरू आहेत. तसेच बुधवारी सकाळ सत्रातील शाळा सुटल्यानंतर सुट्टीचे परिपत्रक जाहीर झाले. त्यामुळे आता प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत सुट्टीचा संदेश कसा पोहोचवणार हादेखील शाळांसमोर प्रश्न असल्याचे दराडे म्हणाले.
सुट्टीचा कालावधी बदलण्यास नकार
शिक्षक संघटनांनी सुट्टीचा कालावधी बदलण्यास नकार दिला आहे. शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक कार्यालयाने याआधी जाहीर केल्याप्रमाणे 1 ते 20 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी आहे. त्यानुसार शाळांमध्ये परीक्षांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना सुट्टी कालावधीची सूचना देण्यात आली आहे, असे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी सांगितले. शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांच्या सहीने काढण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार ऐनवेळी दिवाळीच्या सुट्टीचा कालावधी बदलल्यास शाळांमधील परीक्षांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. विद्यार्थी व पालकांनी मूळगावी जाण्यासाठी केलेले नियोजनही बिघडणार आहे. त्यामुळे शिक्षक भारतीने शिक्षण विभागाच्या गचाळ कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

































































