
बिहार विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर काँग्रेस अधिकच आक्रमक झाली आहे. या निवडणुकीचा एकतर्फी व अनपेक्षित निकाल पाहता काहीतरी गडबड नक्कीच झाली आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. आमचे कार्यकर्ते सर्व प्रकारची माहिती घेत आहेत. फॉर्म 17 सी, मतदार यादीची तपासणी करून अचूक आकडेवारीसह दोन आठवडय़ांत निवडणुकीतील घोटाळय़ाचा पर्दाफाश करू, असा इशारा काँग्रेसने आज दिला.
बिहारच्या निवडणुकीत सत्ताधारी एनडीएला 243 पैकी तब्बल 202 जागा मिळाल्या, तर 61 जागा लढलेल्या काँग्रेसला केवळ 6 जागांवर समाधान मानावे लागले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व इतर नेत्यांमध्ये चर्चा झाली. बैठकीनंतर पक्षाचे नेते अजय माकन यांनी माध्यमांशी संवाद साधला.
‘निकालानंतर आम्हाला कार्यकर्त्यांचे सातत्याने फोन येत आहेत. मोठा घोटाळा झाला आहे असा संशय ते व्यक्त करत आहेत. याची चौकशी व्हायला हवी. आमचे कार्यकर्ते आता डेटा जमा करत आहेत. त्याचे विश्लेषण केले जात आहे. संपूर्ण माहिती हाती आल्यावर आम्ही ते जनतेसमोर ठेवू,’ असे माकन म्हणाले. निवडणूक आयोग पूर्णपणे पक्षपाती आहे, असा आरोप काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केला.
आमचा पक्ष गरीबांचा… गरीबांसाठी काम करत राहणार
‘जनसेवा ही निरंतर प्रक्रिया आहे. यात चढउतार येणे साहजिक आहे. आम्ही पराभवाने खचून जात नाही आणि विजयाने उन्मत्त होत नाही. आमचा पक्ष गरीबांचा आहे. गरीबांसाठी काम करत राहणार,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय जनता दलाने दिली आहे.
1984 मध्येही काँग्रेसचा असा ‘स्ट्राईक रेट’ नव्हता!
अलीकडच्या निवडणुकीत भाजपचा जो स्ट्राईक रेट राहिला आहे तसा 1984 साली सुद्धा काँग्रेसचा नव्हता, असे काँग्रेस नेते अजय माकन म्हणाले. ‘भाजपचा स्ट्राईक रेट 90 टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. काहीतरी काळेबेरे नक्कीच आहे,’ असे ते म्हणाले. 1984 साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळाले होते. काँग्रेसने 533 पैकी 414 जागा जिंकल्या होत्या. तोच संदर्भ माकन यांनी दिला.



























































