
गोवा सरकारमधील भ्रष्ट क्रिडामंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांनी आपले “मिशन 30 टक्के कमिशन” साठी 2017 पासून गोव्यातील दिव्यांग क्रिडापटू, राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके जिंकणारे खेळाडू तसेच क्रिडा संघटना यांचे 2 कोटी 18 लाख रुपयांचे अनुदान व आर्थिक सहायता निधी अडवून ठेवला असल्याचा आरोप कॉंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे. क्रिडामंत्री मनोहर आजगावकरानी त्वरित राजीनामा देत पायउतार व्हावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कॉंग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत प्रवक्त्या स्वाती केरकर व सचिव नारायण रेडकर उपस्थित होते. गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार खेळाडूंना मिळणाऱ्या हक्काच्या व सहायता निधीतून लूट करीत असल्याचा गंभीर आरोप अमरनाथ पणजीकर यांनी केला. सरकारची आर्थिक स्थिती व्यवस्थित असल्याचे सांगत उत्सव साजरे करणाऱ्या डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पर्दाफाश झाल्याचा दावा पणजीकर यांनी केला.
कॉंग्रेस सचिव स्वाती केरकर यांनी बाबू आजगावकर मंत्रीपदावर आहेत तोवर क्रिडा खात्याचा फक्त भ्रष्टाचारात विकास होणार असल्याचे सांगत, सरकारने खेळाडूंच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याची गरज असल्याचे सांगितले. सरकारने सर्वांची रक्कम ताबडतोब फेडावी अशी मागणीही त्यांनी केली. गोव्यातील 16 क्रिडा संघटनांचे 2017 ते 2020 पर्यंतच्या कालावधीत सरकारने 55.59 लाख क्रिडामंत्र्यांनी अडवून ठेवल्याचा पुरावा आमच्याकडे असल्याचे सांगत, 2020-2021 ची आकडेवारी जोडल्यास ही रक्कम मोठी होणार असल्याचा दावा पणजीकर यांनी केला.
गोव्याचे प्रतिनीधीत्व करुन विविध क्रिडा प्रकारात राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण, रौप्य तसेच कांस्य पदक प्राप्त केलेल्या 188 क्रिडापटूचे 2017 ते 2019 पर्यंतचे 16.14 लाख रुपये सरकारने अडवून ठेवले आहेत. आम्ही लवकरच 2020-2021 ची आकडेवारी लोकांसमोर ठेवणार असून, भ्रष्ट क्रिडामंत्र्याचा भष्ट्राचार उघड करणार आहोत, असे पणजीकर म्हणाले. बाबू आजगावकरानी 91 स्थानिक खेळाडूंचे 2017 ते 2018चे 30.20 लाख तसेच 35 खेळाडूंचे 2018-19 वर्षाचे 23.64 लाख अडविल्याची माहिती पणजीकर यांनी दिली.
असंवेदनशीलतेचा कळस गाठताना आजगावकरानी हलाकीच्या परिस्थीतीत जगणाऱ्या 23 खेळाडूनांही सोडले नसून, 2018-19 वर्षासाठीचे मदत निधीचे 14.64 लाख अडवून ठेवले आहेत. तसेच 2019-20 वर्षासाठीचे 62 खेळाडूंचे 38.88 लाख अजूनही फेडले नसल्याचे पणजीकर यांनी सांगीतले. क्रिडा खात्याने 2020-21 चे 60 खेळाडूंचे 39.48 लाख अजुनही दिले नसल्याची माहीती त्यांनी दिली. भाजप सरकारचे भांडवलशाही धोरण या आकडेवारीतुन उघड होत आहे. राज्यासाठी योगदान दिलेल्यांची कदर करणे सरकारला जमत नसल्याची टीकाही पणजीकर यांनी केली.


























































