
नांदेडसह राज्याच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव सुरू आहे. या परिस्थितीमागची नेमकी कारणे काय आहेत आणि औषध पुरवठय़ाची स्थिती काय होती याची खरी माहिती महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी राज्य शासनाने आरोग्य व्यवस्थेसंदर्भात तातडीने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी आज केली.
थोरात यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे. शासकीय रुग्णालयांतील मृत्यूंना मी एकटा नाही तर संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार आहे, असे आरोग्यमंत्री म्हणतात. त्यामुळे मंत्रिमंडळानेच राजीनामा दिला पाहिजे, असे थोरात यांनी नमूद केले. कोविड काळात याच आरोग्य यंत्रणेने अनेक रुग्णांना वाचवले. तेव्हाच्या सरकारचा हेतू प्रामाणिक होता. नव्या सरकारच्या काळात ही यंत्रणा अपयशी का ठरतेय, असा सवाल करतानाच शासनाच्या गलथान कारभारामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप त्यांनी केला.































































