भारत जोडो यात्रेच्या सांगता सोहळ्यात सहभागी होणार हे पक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू झालेली भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबर 2022 रोजी देशाच्या दक्षिण भागात सुरू झाली होती. आता 145 दिवसांनंतर 3970 किमी, 12 राज्यं आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधून प्रवास केल्यानंतर सोमवारी 30 जानेवारी 2023रोजी श्रीनगर येथे त्याची सांगता होत आहे. या सांगता सोहळ्यात 12 विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत.

या सांगता सोहळ्यासाठी 21 पक्षांना आमंत्रित करण्यात आलं होतं. पण काही पक्ष सुरक्षेच्या कारणास्तव या यात्रेत सहभागी होणार नाहीत. यात तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि टीडीपी या पक्षांचा समावेश आहे. तर, द्रविड मुन्नेत्र कळघम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), सीपीआय (एम), विदुथलाई चिरुथाइगल काची, केरळ काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि झारखंड मुक्तीमोर्चा हे पक्ष सांगता सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

बनिहाल या ठिकाणी राहुल यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाल्याचे निदर्शनास आल्याने शुक्रवारी यात्रा थांबवावी लागली. सुरक्षेच्या कारणावरून शुक्रवारी मध्येच थांबवावी लागलेली यात्रा शनिवारी सकाळी पुलवामा जिह्यातील अवंतीपोरा येथून पुन्हा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भारत जोडो यात्रेच्या सुरक्षेत हेळसांड नको, तुम्ही स्वतः लक्ष घाला, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केली आहे.