
चिपळूण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आयत्यावेळी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले माजी नगरसेवक सुधीर शिंदे यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवलेल्या त्यांच्या पत्नीचाही पराभव झाला. यामुळे शिंदे कुटुंबाला दुहेरी धक्का बसला आहे. या पराभवाने सुधीर शिंदे चांगलेच खचले असून त्याची झळ त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही उमटताना दिसत आहे.
पराभवाच्या वेदनेतून सुधीर शिंदे यांनी आपल्या दुकानाबाहेर थेट ‘कोणीही देणगी मागायला येऊ नये’ असा मजकूर असलेला भला मोठा फलक लावला आहे. हा फलक सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला असून, निवडणुकीनंतरच्या राजकीय आणि मानसिक स्थितीचे ते प्रतीक मानले जात आहे.
नगराध्यक्षपदाची निवडणूक संपल्यानंतर उमेदवारांकडून अशा प्रकारे जाहीर प्रतिक्रिया उमटणे क्वचितच पाहायला मिळते. त्यामुळे हा बॅनर नागरिकांमध्ये कुतूहल आणि चर्चेचा विषय बनला असून, निवडणुकीतील पराभवाचे पडसाद किती खोलवर उमटतात, याचेच हे उदाहरण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.



























































