
जनसुरक्षा विधेयकाला विधिमंडळात कडाकडून विरोध का केला नाही, अशा आशयाची नोटीस कॉँग्रेसने पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि गटनेते सतेज पाटील यांना बजावली आहे. हायकमांडच्या आदेशावरून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नोटीस पाठवून खुलासा मागविला आहे.
जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून सरकार एकप्रकारे हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारविरोधातील आवाज दडपण्यासाठीच आणलेल्या या काळय़ा कायद्याला कडाडून विरोध करा, अशा सूचना काँग्रेसकडून सर्व आमदारांना देण्यात आल्या होत्या. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी जनसुरक्षा विधेयकाला विरोध कसा करायचा, कोणते मुद्दे आक्रमकपणे मांडायचे, याबाबत सविस्तर टिप्पणी दिली होती. मात्र, विधिमंडळाच्या सभागृहात हे विधेयक चर्चेला आले तेव्हा कॉँग्रेस सदस्यांनी ज्याप्रकारे विरोध करणे अपेक्षित होते तसा विरोध करण्यात आला नाही. यामुळे काँग्रेस हायकमांडने नाराजी व्यक्त केली आहे.
स्ट्राँगली विरोध करायला हवा होता – वडेट्टीवार
जनसुरक्षा विधेयकाला आम्ही स्ट्राँगली विरोध करायला हवा होता. त्यामुळे विधेयकाच्या विरोधात संदेश गेला असता, पण ते झालं नाही. मी सभागृहात असतो तर मी सभागृहातच बिल फाडून टाकलं असतं. सभागृहात काँग्रेसचे जे नेते होते त्यांनी योग्य बाजू मांडली. त्यांनी केलेले भाषण आम्ही हायकमांड तसेच प्रदेशाध्यक्षांनासुद्धा पाठवणार आहोत, असे वडेट्टीवार म्हणाले.
सभागृहात काय घडले ते पक्षश्रेष्ठींना कळवू – सतेज पाटील
जनसुरक्षा विधेयकाच्या वेळी आम्ही सभागृहात होतो. काँग्रेस सदस्यांनी नेमकी काय बाजू मांडली? सभागृहात काय घडले ते आम्ही पक्षश्रेष्ठाRना कळवू. समितीमध्येसुद्धा सूचना दिल्या होत्या. आम्ही जी काय माहिती आहे ती पक्षाला कळवू, असे सतेज पाटील म्हणाले.
चर्चेच्या वेळी सभागृहात दांडी
विधानसभेत जनसुरक्षा विधेयक ज्या दिवशी चर्चेला आले त्या वेळी विजय वडेट्टीवार सभागृहात हजर नव्हते. वडेट्टीवार यांनी जाणीवपूर्वक दांडी मारल्याचा चुकीचा संदेश यामुळे सर्वत्र गेला आहे. दरम्यान वडेट्टीवार यांनी जिल्हा बँकेची निवडणूक असल्याने मी उपस्थित नव्हतो, असे म्हटले आहे.