
संयुक्त महाराष्ट्र 1960 साली अस्तित्वात आला. तेव्हा पासून बहुतांशवेळा काँग्रेसचीच सत्ता राहिली आहे. 1960 ते 2014 या काळात काँग्रेसचे 14 मुख्यमंत्री झाले. त्यापैकी फक्त वसंतराव नाईक यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करण्यात यश आले. काहींचे मंत्रिपद पक्षश्रेष्टींनी काढले तर काहींवर घोटाळ्याचे आरोप झाल्यामुळे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागली.
1980 साली केंद्रात इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत विराजमान झाल्या. तेव्हा त्यांनी काँग्रेसेतर 9 राज्यातील सरकारे बरखास्त केली. त्यात महाराष्ट्राचाही समवेश होता. इंदिरा गांधींनी शरद पवारांचे पुलोद सरकार पाडले आणि राष्ट्रपत्री राजवट लागू केली. नंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचाच विजय झाला. तेव्हा इंदिरा गांधी यांनी बॅरिस्टर अंतुले यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. अंतुले हे राज्याचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री होते. नंतर सिमेंट घोटाळा गाजला आणि त्यांना मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडावे लागले.
1985 साली शिवाजी पाटील निलंगेकर यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली. निलंगेकर जेमतेम वर्षभर मुख्यमंत्री होते. आपल्या मुलीच्या वैद्यकीय परीक्षेत गुण वाढवण्यात यांनी हस्तक्षेप केला असा आरोप त्यांच्यावर झाला. त्यामुळे त्यांना आपली मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागली.
त्यानंतर थेट 2010 साली तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कारकीर्द बहरत असताना आदर्श घोटाळा समोर आला. आदर्श इमारतीत माजी सैनिकांसाठी घरे राखीव ठेवण्यात आली. त्यात मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी नातेवाईकांनाच घरे वाटल्याचा आरोप झाला. अखेर 2011 मध्ये त्यांना राजीनामा देऊन पद सोडावे लागले.






























































