
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना तुर्तास तरी बदलू नका अशी सूचना राज्यातील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसच्या प्रभारींना केली आहे पण तरीही प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी तीन नाव सुचवण्याचे आवाहन काँग्रेसच्या शक्ती अँपव्दारे केले जात आहे. प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी काँग्रेसने डिजिटल मत मागण्यास सुरवात केल्याचे वृत्त आहे
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या मुंबई दौर्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत काँग्रेसचे मंत्री, नेते व पदाधिकार्यांची मते जाणून घेतली. पण आगामी ग्रामपंचायतीच्या व महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष बदलू नका अशी विनंती काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे.
पण तरीही महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी तीन नावे सुचवण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना केले आहे. त्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. एच. के. पाटील यांच्या आवाजात सर्व नेत्यांना एक डिजिटल कॉल जात आहे.
प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी काँग्रेसच्या शक्ती अँपची मदत घेतली जाणार आहे. या अँपव्दारे डिजिटल मतदान घेण्याची तयारी सुरु केली आहे. राज्यातील काँग्रेसचे पाचशेहून अधिक प्रदेश प्रतिनिधी आहेत. या सर्वांना प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी पसंतीक्रमानुसार मत नोदवण्याच्या सुचना दिल्या आहेत.































































