
काँग्रेस-राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवातून धडा घेत छोटय़ा-मोठ्या पक्षांची मोट बांधत विधानसभेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये दहा जागांवरून रस्सीखेच सुरू असून इच्छुकांना तूर्तास तरी ‘श्रद्धा आणि सबुरी’चे निरोप देण्यात आले आहेत. आघाडीपासून फारकत घेत स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केलेल्या समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचे मन वळवण्यात आघाडीच्या नेत्यांना यश आले आहे. अन्य घटक पक्षांसोबत चर्चा सुरू असून आघाडीच्या जागावाटपाची लवकरच घोषणा करण्यात येईल, अशी माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी संयुक्त पुरोगामी महाआघाडीची घोषणा केली जाईल अशी घोषणा दोन दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्या दृष्टिकोनातून दक्षिण मुंबईत दिवसभर बैठका सुरू होत्या. या बैठकीला काँग्रेसच्या वतीने विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, समाजवादी पक्षाचे अबू आझमी या प्रमुख नेत्यांसह शेकापचे जयंत पाटील, राजू शेट्टी तसेच घटक पक्षांचे सदस्य होते.
दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेत महाआघाडीची घोषणा होईल असा निरोप प्रसिद्धीमाध्यमांना पाठवण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषद 4 वाजता होईल असा निरोप पाठवण्यात आला. मग वाजेपर्यंत पत्रकार परिषद होईल असे सांगण्यात आले. अखेर यशवंतराव चव्हाण केंद्रातील हॉलमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आले आणि त्यांनी संयुक्त महाआघाडीची चर्चा अजून अपूर्वावस्थेत असल्याचे सांगितले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात असून घटक पक्षांशी चर्चा सुरू आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील जागावाटप झाले आहे. एका घटक पक्षाशी चर्चा सुरु आहे. चार ते सहा मतदारसंघांतील जागेबाबत चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. कोणत्या एका घटक पक्षाशी चर्चा रखडली आहे, असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांना विचारला असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. मात्र समाजवादी पक्षाचे जागावाटप झाले असून शिवाजीनगर, भिवंडी पूर्व, संभाजीनगर पूर्व या तीन जागा सोडण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाआघाडीचा निर्णय झाल्यावर प्रेस नोट जारी केली जाईल असे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.
अबू आझमींची काँग्रेसला चपराक
समाजवादी पक्षाने सात जागा मागितल्या होत्या, पण त्यांनी मोठे मन दाखवून तीन जागा मान्य केल्याचे यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. त्याचा धागा पकडून समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी काँग्रेसला टोला मारताना म्हणाले की, महाआघाडीच्या जागावाटपाची चर्चा मुंबईतील हे नेते करतात, पण जागावाटप दिल्लीतून करतात. त्यावर शेजारीच व्यासपीठावर बसलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी नकळत मान डोलावली आणि हसले.
























































