काँग्रेस-राष्ट्रवादीची दिल्लीतील बैठक संपली, आता महाराष्ट्रातच निर्णय जाहीर होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
prithviraj-chavan

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट संपवून स्थिर सरकार देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच संदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिल्लीत सुरू असलेले बैठकीचे सत्र अखेर संपले असून सकारात्मक चर्चेतून दोन्ही पक्षांमध्ये आता एकवाक्यता असल्याचे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पुढील निर्णय हे महाराष्ट्रात जाहीर करण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक गुरुवारी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्र बैठक घेण्यात आली. ही बैठक झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोन्ही पक्षात सर्व चर्चा सकारात्मक झाली. ‘सर्व मुद्द्यांवर एकमत झाले आहे. आता महाराष्ट्रात निवडणुकीआधी झालेल्या आघाडीतील मित्रपक्षांशी पुढली चर्चा होईल. त्यानंतर शिवसेनेसोबत याची चर्चा केली जाईल. त्यानंतर महाराष्ट्रातून निर्णय जाहीर केला जाईल’, असे त्यांनी स्पष्ट केले.