मोदी सध्या प्रेम चोप्रा आणि परेश रावलसारखे डायलॉगबाजी करताहेत, काँग्रेसचे पंतप्रधानांना चार खणखणीत सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ प्रेम चोप्रासारखे डायलॉग मारत आहेत, परंतु अनेक गंभीर प्रश्नांची त्यांनी अजूनही उत्तरे दिलेली नाहीत. त्यांचे खासदारही क्षुल्लक राजकारण करत आहेत, अशा शब्दांत आज काँग्रेस नेते पवन खेरा यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. पहलगाम हल्ल्याला एक महिना उलटूनही दहशतवादी मोकाट आहेत, याकडे लक्ष वेधतानाच खेरा यांनी मोदींना चार प्रश्न विचारले आहेत.

मोदी प्रेम चोप्रासारखे तर कधी परेश रावलसारखे डायलॉग मारत आहेत. कधी ते म्हणतात, माझ्या नसांमध्ये गरम सिंदूर वाहतो. तर कधी भाकरी खा, गोळ्या खा असे संवाद ते फेकतात. हे एका गंभीर नेत्याचे वर्तन आहे का, असा सवालही खेरा यांनी केला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन खेरा यांनी मोदींना पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे काय झाले, असा सवाल केला.

मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे अपयशी झाले असून या विनाशकारी धोरणामुळे आपण एकाकी पडलो आहोत, असे खेरा म्हणाले. नेपाळ आणि भूतानदेखील आमच्यासोबत उभे राहिले नाहीत. तर संघर्षादरम्यान चीनने उघडपणे पाठिंबा दिला, असा आमच्या परराष्ट्र धोरणाचा परिणाम आहे. इतकेच नाही तर कुवेतने पाकिस्तानवरील व्हिसा निर्बंध हटवले. कुवेत पाकिस्तानसोबत करारही करत आहे. दुसरीकडे यूएईनेही पाकिस्तानला 5 वर्षांच्या व्हिसासाठी परवानगी दिली आहे. इराणनेही पाकिस्तान दहशतवादाला आश्रय देत असल्याचे म्हटले आहे.

विरोधी पक्ष हिंदुस्थानची बाजू उत्तम प्रकारे मांडत आहेत

मोदी सरकारला जेव्हा कळले की, आपल्या परराष्ट्र धोरणामुळे आपण एकाकी पडलो आहोत. तेव्हा त्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेशात पाठवले. काँग्रेस आणि इतर पक्षांचे खासदार परदेशात हिंदुस्थानची उत्तम प्रकारे बाजू मांडत आहेत. परंतु भाजप सरकार तेथे विषारी विधाने करत आहेत. हिंदुस्थानची बाजू मांडण्यासाठी परदेशात गेलेला त्यांचा एक खासदार तर रोज सोशल मीडियावर गरळ ओकत आहे, असा आरोपही खेरा यांनी केला.

ट्रोलर्स ठरवतात परराष्ट्र धोरण

मोदी सरकारचे ट्रोलर्स देशाचे परराष्ट्र धोरण ठरवत आहेत. कधी ते इस्लामाबादवर हल्ला करतात आणि कब्जा करतात तर कधी कराचीवर. मोदी सरकार चालवणारे लोक ट्रोलिंग करत आहेत. हे सर्वांसमोर आहे. पंतप्रधान स्वतः ट्रोलर्सची भाषा बोलू लागले आहेत, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे, असेही खेरा यांनी म्हटले आहे.

कॉग्रेंसचे प्रश्न

1
पहलगामवर हल्ला करणाऱया दहशतवाद्यांचे काय झाले?
2
हाफिज सईद आणि मसूद अजहर कसे पळून गेले?
3
पाकिस्तानशी युद्धविराम कोणत्या अटींवर केला?
4
अटींमध्ये या दहशतवाद्यांना परत आणण्याचा मुद्दा होता काय?