केंद्र सरकारची थेट मदत हवी, सल्ले नको – पृथ्वीराज चव्हाण

कोरोना लढाई दीर्घकाळ चालणारी आहे. त्यासाठी केंद्र सरकारची थेट मदत हवी, सल्ले नको, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

पुणे मनपा हॉस्पिटल्सचे ‘कोरोना योद्धा’रुपी डॉक्टर्स, नर्सेस, मेडिकल स्टाफ यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पीपीई किट्स, एन-95 मास्क, सॅनिटायझर, रोग प्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या गोळ्या वाटप करण्यात आल्या, त्यावेळी ते बोलत होते. कमला नेहरू हॉस्पिटलचे डॉ. मंदार नागमोडे, राजीव जगताप, सूर्यकांत मारणे, भाऊ शेडगे, रवी मोहिते, राजेंद्र खराडे, प्रसन्न पाटील, जयसिंग भोसले, गौरव बोराडे, योगेश भोकरे, महेश अंबिके, नितीन पायगुडे, संजय अभंग, अशोक काळे, शंकर शिर्के, गणेश कुरे, आशिष गुंजाळ यावेळी उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘कोरोनामुळे अर्थचक्राचा वेग मंदावला आहे. त्याकरिता ’अर्थकारणाची पोकळी’ भरून काढण्यासाठी सरकारने कृती केली पाहिजे. रोजंदारीवर पोट असणाऱ्यांसाठी तातडीने थेट अर्थसाहाय्य दिले पाहिजे; अन्यथा ‘रोजगाराच्या चक्रात, सामाजिक वावर अंतर पाळण्याची पथ्ये गरिबांना पाळता येणार नाहीत. जनतेला पोकळ सल्ले देऊन काम भागणार नाही, त्यासाठी थेट मदत करा’, असा सल्लाही त्यांनी केंद्र सरकारला दिला. ‘राजीव गांधी स्मारक समिती’ व गोपाळ तिवारी मित्र परिवार यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक गोपाळ तिवारी यांनी केले. सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीक काकरे यांनी स्वागत केले. राजेंद्र खराडे यांनी आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या