राहुल गांधी परदेशात का गेले? काँग्रेसमध्ये चर्चांना उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकांसाठीच्या प्रचाराने जोर पकडला आहे. सर्व राजकीय पक्षांनी या दोन्ही राज्यात आपल्या पक्षाला दणदणीत यश मिळावं म्हणून मतदारांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली आहे. सभा, रोड शो, मतदारांच्या भेटी, अशा भरगच्च कार्यक्रमांची तयारी प्रमुख पक्षांनी सुरू केली आहे. स्टार प्रचारक कोणकोणत्या मतदार संघात पोहोचणार अशी देखील चर्चा आहे. मात्र असे असताना काँग्रेसमध्ये थंड वातावरण आहे. इकडे निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भर असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि पक्षाचे स्टार प्रचारक राहुल गांधी हे मात्र अचानक परदेशात निघून गेले आहेत. त्यांच्या या निर्णयाने पक्षातील नेते, कार्यकर्ते सारेच बुचकळ्यात पडले असून विविध चर्चांना उधाण आले आहे.

लोकसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष असलेले राहुल गांधी यांनी देशभरात जोरदार प्रचारसभा घेतल्या. या प्रचारसभांमधून त्यांनी सरकारवर टीका करत वातावरण निर्मितीचा प्रयत्न देखील केला. मात्र असे असले तरी काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. खुद्द राहुल गांधी हे अमेठीमधून पराभूत झाले. यानंतर त्यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. मात्र राहुल गांधी हे प्रक्रियेत कुठेही दिसले नाहीत. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यातच राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्याविषयी चर्चा रंगल्या होत्या. काँग्रेसमधील काही नेत्यांना राहुल हे पक्षात सध्यस्थितीत सुरू असलेल्या अनेक घडामोडींवर नाखुश आहेत असं वाटत आहे. पक्षांतर्गत बंडाळी, अतिशय निकटच्या नेते-कार्यकर्त्यांनी पक्षाला केलेला रामराम, पक्ष सोडताना त्यातील घटनांवर केलेली टीका आणि पक्षातील वरिष्ठांनी केलेल्या राजकीय उपेक्षेला कंटाळून राहुल यांनी परदेशी जाणं पसंत केल्याचं काँग्रेस वर्तुळात बोललं जात आहे. राहुल गांधी हे नेमके बँकॉकला गेलेत की आणखी कुठे, यावरही काँग्रेसमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहेत. त्यातच काही नेत्यांनी राहुल यांचं परदेशी जाणं पक्षांतर्गत घडामोडींशी जोडल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

हरयाणा काँग्रेसचे माजी अध्यक्ष अशोक तंवर यांनी शनिवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ते राहुल गांधी यांच्या निकटवर्तियांपैकी एक मानले जातात. काँग्रेसमध्ये तरुण नेत्यांना हटवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे, ज्यांना राहुल यांनी तयार केलं आहे, असा आरोप तंवर यांनी केला होता. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही अशाच प्रकारचे आरोप केले होते. राहुल यांच्या निकट असलेल्या काहींनी आपली राजकीय कारकिर्द संपवण्याचा कट रचला असून अशाने काँग्रेस बरबाद होईल, अशी टीका निरुपम यांनी केली होती. हे असंच सुरू राहिलं तर लवकरच पक्षातून बाहेर पडण्याचा इशाराही निरुपम यांनी दिला होता.