नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोल रहा हूँ, राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

हा देश द्वेषाचा नाही तर प्रेमाचा आहे, असे सांगत कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेबाबत प्रश्न उपस्थित करणाऱया भाजपवर निशाणा साधला. नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोल रहाँ हू, आइए आप भी, असे आव्हानच त्यांनी भाजप नेत्यांना दिले.

राजस्थानमधील मालाखेडा येथे भारत जोडो यात्रेदरम्यान आयोजित सभेत राहुल गांधी यांनी देशात भाजपकडून सुरू असलेल्या द्वेषाच्या राजकारणावर जोरदार टीकास्त्र सोडले. मला भाजपचे लोक वाईट वाटत नाहीत. मी ज्या रस्त्याने जातोय त्याकडे बोट दाखवून ते प्रश्न विचारतात की तुम्ही काय करता? त्यांना मी सांगू इच्छितो, द्वेषाच्या बाजारात मी प्रेमाचे दुकान उघडतोय, तुम्ही मात्र सर्वत्र द्वेष पसरविण्याचे काम करताय, असा टोला भाजप नेत्यांना लगावला. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याच्या आठवणही त्यांनी विरोधकांना करून दिली.

प्रत्येक मुलाला इंग्रजीचे शिक्षण मिळाले पाहिजे

माझा हिंदीला विरोध नाही, हिंदीबरोबरच प्रत्येक मुलाला इंग्रजीचे शिक्षण मिळालेच पाहिजे, असे सांगत राहुल गांधी यांनी राजस्थान सरकारच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. इंग्रजीला विरोध करणाऱया अमित शहांपासून भाजपच्या बहुतांश नेत्यांची मुले ही इंग्रजी माध्यमांच्या शाळांत शिकत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.