काँग्रेसला मोठा धक्का, खासदार संजय सिंह यांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे धक्के बसत असतानाच देशातही ज्येष्ठ नेत्यांचा पक्षनेतृत्वावर विश्वास कमी होताना दिसत आहे. मंगळवारी गांधी कुटुंबाच्या जवळचे मानले जाणारे खासदार डॉ. संजय सिंह यांनी काँग्रेसचा हात सोडला. संजय सिंह यांनी काँग्रेस आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

दरम्यान, राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी संजय सिंह यांचा राजीनामा स्वीकारला आहे. बुधवारी ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.

‘गेल्या 15 वर्षामध्ये काँग्रेसमध्ये जे झाले ते कधीही झाले नाही. काँग्रेसमध्ये नेतृत्व शून्य आहे’, अशी प्रतिक्रिया संजय सिंह यांनी दिली आहे. तसेच भाजपच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेने प्रेरित होऊन मोदींसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, संजय सिंह यांच्यासह त्यांच्या पत्नी अमिता सिंह यादेखील काँग्रेस सोडण्याच्या तयारीमध्ये आहेत.

संजय सिंह यांना काँग्रेसने आसामधून राज्यसभेवर पाठवले होते. परंतु एक वर्षाचा कार्यकाळ बाकी असतानाच त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, संजय सिंह यंदा सुल्तानपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक मैदानात उतरले होते. परंतु एनडीएच्या घोंघावापुढे ते आपली जमानतही वाचवू शकले नाहीत.