
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबईत येऊन महाराष्ट्रातील उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांची भेट घेणार आहेत. उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांना धमकावण्याचा प्रयत्न यातून केला जाऊ शकतो अशी भीती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज व्यक्त केली.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील उद्योजक, बॉलिवूड यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे षडयंत्र मागील काही महिन्यापासून केले जात असल्याचे उघड झाले आहे. एनसीबीच्या माध्यमातून बॉलिवूडला बदनाम करण्याचे प्रयत्न अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणापासून कसे केले जात आहेत हेही स्पष्ट झाले आहे. मोदी सरकारच्या मदतीने महाराष्ट्राला बदनाम करण्याच्या मोहिमेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांचाही पुढाकार राहिलेला आहे. महाविकास आघाडी सरकारने उद्योगपती व बॉलिवूडच्या पाठीशी खंबरपणे उभे राहण्याची गरज आहे असे सचिन सावंत म्हणाले.
























































