ब्रेकिंग न्यूज: नाराज प्रियंकांची अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी ( Priyanka Chaturvedi ) यांनी पक्षाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत अखेर राजीनामा दिला आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या गैरवर्तामुळे नाराज झालेल्या प्रियंका यांनी बुधवारी आपल्या अधिकृत ट्वीटवर हँडलवरून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज त्यांनी थेट पक्षाचा राजीनामा दिला.

priyanka-chaturvedi-new

प्रियंका काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील मथुरा येथे होत्या. राफेल करारा संदर्भात काँग्रेसकडून येथे एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियंकांसोबत गैरवर्तन केले होते. यासंदर्भात त्यांनी तात्काळ राज्याच्या समितीकडे तक्रार केली, त्यानंतर कार्यकर्त्यांवर कारवाई देखील करण्यात आली. मात्र माफीनाम्यानंतर त्यांच्यावरील कारवाई तात्काळ मागे घेण्यात आली. यामुळे प्रियंका यांना धक्का बसला. त्यांनी आपली नाराजी थेट ट्विटरवर हँडलवरून व्यक्त केली होती.

‘पक्षासाठी घाम गाळणाऱ्या, रक्ताचं पाणी करणाऱ्यांऐवजी गुंडगिरी करणाऱ्यांना अधिक महत्व दिले जाते ही अत्यंत खेदाची बाब आहे. पक्षासाठी मी लोकांकडून शिव्या ऐकल्या, मारहाण देखील सहन केली. असे असताना देखील पक्षातील ज्या लोकांनी मला धमकावलं त्यांच्याविरोधात कोणतेही ठोस पाऊचलले गेले नाही. हे खरंच खेदजनक आहे’, असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये स्पष्ट म्हटले आहे.