मोदी यांनी खरंच 11 दिवस उपास केला ? काँग्रेस नेत्याने उपस्थित केला प्रश्न

अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि प्रभू श्री रामाच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. या सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी आपण 11 दिवसांचा उपास केला होता असे म्हटले होते. त्यांच्या या दाव्यावर काँग्रेसचे नेते वीरप्पा मोईली यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंतप्रधान मोदींच्या उपोषणावर प्रश्न उपस्थित केला आहे. मोदी यांनी खरोखर 11 दिवसांचा उपास केला असल्याच्या दाव्यावर आपल्याला शंका येत असून उपास न करता गर्भगृहात प्रवेश केला तर ती जागा अपवित्र होते आणि अशा जागेतून शक्ति निर्माण होत नाही असे मोईली यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या वीरप्पा मोईली यांनी म्हटले की, ते डॉक्टरांसोबत मॉर्निंग वॉक करत असताना डॉक्टरांनी म्हटले की अन्नपाणी न घेता इतके दिवस माणूस जगू शकत नाही. जर अन्नपाण्याशिवाय माणूस इतके दिवस जगला तर तो चमत्कारच म्हणावा लागेल. पंतप्रधानांनी असे म्हटले होते की प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी 11 दिवस आधी त्यांनी कडक उपास केला होता. ते जमिनीवर झोपायचे आणि फक्त नारळपाणी पीत होते. या काळात त्यांनी देशातील विविध मंदिरांनाही भेटी दिल्या होत्या आणि तिथे स्वच्छता मोहीम राबवली होती.

अयोध्येत रामरायाच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर

अयोध्येतील राम मंदिरात सोमवारी न भूतो न भविष्यति असा प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाला. मंगळवारी पहाटेपासूनच रामरायाच्या दर्शनाला सुरुवात झाली. भाविकांच्या गर्दीचा ओघ अखंड सुरू आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास गर्दी इतकी प्रचंड वाढली की, पोलिसांनी 500 मीटर अंतरावर लावलेली बॅरिकेड्स तोडून भाविकांनी मंदिर परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत सौम्य लाठीमार केला, मात्र त्यामुळे काही प्रमाणात चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली.

भाविकांची गर्दी वाढत चालल्याचे पाहून पोलीस आयुक्त, महानिरीक्षक आणि अतिरिक्त पोलीस महासंचालकांना घटनास्थळी धाव घेऊन हातात माईक घेऊन भाविकांना शांत राहण्याचे आवाहन करावे लागले. तसेच भाविकांनी आजच दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी करू नये. दुसऱया दिवशीही रामलल्लाचे दर्शन घेता येईल. त्यामुळे उद्या किंवा परवा अयोध्येत यावे, असे आवाहनही पोलीस करताना दिसले. मात्र गर्दीचा ओघ वाढतच राहिला. दुपारी 2 वाजल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने काही वेळाने पोलीस पोलीस महासंचालक प्रशांत कुमार आणि गृह विभागाचे प्रधान सचिव संजय प्रसाद हे राम मंदिरात पोहोचले आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी परिसराचा ताबा घेतला.

प्रचंड उत्साह, भाविकांची रीघ

मंगळवारी पहाटेपासूनच अयोध्येत प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसले. बाराबांकीपासून, लखनौ, कानपूर तसेच आजूबाजूच्या जिह्यांतून, गावांतून मोठय़ा संख्येने भाविक अयोध्येत येत आहेत. रस्तोरस्ती रामाचे भजन, कीर्तन वाजवले जात असून श्रीरामाचे चित्र असलेले झेंडे हातात घेऊन ‘जय श्रीराम’ असा नारा देत भाविक मंदिर परिसरात प्रवेश करतानाचे चित्र आहे. दिवसभरात जवळपास पाच लाख भाविक रामरायाचे दर्शन घेतील, असा अंदाज स्थानिक प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

बालक राम म्हणून ओळखले जाणार रामलल्ला

अयोध्येतील रामलल्ला हे बालक राम म्हणून ओळखले जातील असे राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळय़ाशी निगडित पुजारी अरुण दीक्षित यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. ही पाच वर्षांच्या निरागस बालकाची मूर्ती आहे. त्यामुळे या रामलल्लाला बालक राम म्हणता येईल, असे ते म्हणाले. बालमूर्तीच्या दागिन्यांसाठी रामायण, वाल्मीकी रामायण, रामचरितमानस या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर संशोधन करण्यात आले. तीन अब्ज वर्षे जुन्या पाषाणातून रामलल्लाची बालमूर्ती अरुण योगीराज यांनी साकारली आहे.