
सामना ऑनलाईन,मुंबई
गेले तीन दिवस मुंबईसह राज्यभरात तुफानी वाऱ्यांसह बरसलेल्या मुसळधार पावसाने आज सोमवारी मुंबईसह उपनगर आणि ठाणे, वसई, विरार, पालघरमध्ये उसंत घेतली. दिवसभर आकाश ढगाळ होते. अधूनमधून एखादी हलकी सर येऊन जात होती. पुढचे दोन दिवस मात्र ठाणे, पालघर, कोकण, नाशिक, पुणे, साताऱ्यासह राज्यभरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यभरात पाऊस पडत आहे. मुंबईसाठी यलो तर राज्यभरात ऑरेंज ऍलर्ट देण्यात आला आहे.
मध्य रेल्वे पाऊण तास उशिरा
शनिवार आणि रविवार अशी कोलमडलेली मध्य आणि हार्बर रेल्वेची सेवा सोमवारी हळूहळू पूर्वपदावर आली. सकाळी ठाणे, कुर्ला, दादर स्थानकात प्रचंड गर्दी उसळली. लोकलसेवा अर्धा ते पाऊण तास उशिराने सुरू होती. पिकअवरमध्ये मध्य रेल्वेचा गोंधळ झाल्याने चाकरमान्यांना लेटमार्क लागला.
मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
गुजरात आणि कोकण किनारपट्टीवर ताशी 55 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
सुखावणाऱ्या लाटा…
ढगाळ वातावरण आणि अधूनमधून हलका पाऊस अशा वातावरणात आज सोमवारी चौपाटय़ांवर समुद्राच्या लाटा वाऱ्याशी अशा स्पर्धा करत होत्या.
























































