
सामना ऑनलाईन | येवला,
येवला ते नांदगाव राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूने असलेली वृक्षांची तोड बांधकाम विभागामार्फत ठेकेदाराने सुरू केली आहे. यामुळे हा रस्ता बोडखा दिसू लागला असून सुमारे चारशेच्या आसपास झाडांची कत्तल होणार असल्याने या रस्त्याचे सौंदर्य हरवून जाणार आहे.
एरंडोल ते येवला असा राज्य महामार्ग अस्तित्वात येत आहे. त्यासाठी येवला ते नांदगावदरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूने प्रत्येकी एकेक मीटर रुंदीकरण केले जाणार असल्याचे सांगण्यात येते. सद्यस्थितीत दोन्ही बाजूने शेकडो झाडे आहेत. या झाडांनी या रस्त्याचे सौंदर्य अधिकच खुलले आहे, मात्र या सौंदर्याला आता दृष्ट लागली की काय असे चित्र
येवल्याच्या पुढे निघाल्यानंतर मातुलठाणच्या परिसरात दिसून येत आहे. लिंबासह इतर सर्व प्रकारच्या मोठमोठय़ा वृक्षांची कत्तल सुरू असून येवला रेल्वे गेटपासून नगरसुलच्या दिशेने आतापर्यंत 80 च्यावर झाडे कापून वाहून नेण्यात आली आहेत. पुढे नांदगावपर्यंत अशीच कत्तल होणार असल्याने सुमारे 400 झाडे जमीनदोस्त होऊन हा रस्ता बोडका होणार आहे. येवला ते नाशिक महामार्गाच्या कडेला पाच-सहा वर्षांपूर्वीच्या या वृक्षांची कत्तल केल्याने ओळखू येणार नाही इतका रया त्याची गेली आहे. त्याच्या कडेला नियम पाळत वृक्ष लागवडीचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी ठेकेदाराने केले, पण त्याला म्हणावे असे यश आले नाही.
वृक्ष लावा, जतन करा, पर्यावरण सांभाळा असा संदेश देणाऱया वनविभागानेही वृक्षांच्या कत्तलीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे खुलेआम वृक्ष तोड सुरू आहे. बांधकाम विभागाने रस्ता रुंदीकरणासाठी हे बहरलेले वृक्ष जमीनदोस्त करण्याचा धडाका लावला आहे. मात्र या पुढील काळात रस्त्याचे काम झाल्यानंतर दुतर्फा नव्याने वृक्षलागवड करून त्याची वाढ होईपर्यंत संगोपनाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सदर रोड हा मोठा होणार आहे त्यासाठी झाडांची कत्तल सुरू आहे. मात्र रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर रोडच्या बाजूला दुतर्फा झाडे लावणे व सलग तीन वर्षे त्यांची निगा राखणे हे काम त्या ठेकेदाराकडून सक्तीने करून घेतले पाहिजे, यासाठी नियम हवा.
– दिनेश राऊत,
ममदापूर (समाजसेवक)































































