
देशातील कोरोनाच्या फैलावाला ‘सुपर स्प्रेडर्स’ प्रमुख कारण बनल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. अशा प्रकारच्या 8 टक्के कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्यामुळे 60 टक्के नवीन रुग्णांमध्ये संसर्ग आढळून आला. तसेच 70 टक्के कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या कुणालाही संसर्ग झाला नाही. कोरोनामुळे मृत्यू झालेले 63 टक्के लोक आधीपासून दुसऱया आजाराने त्रस्त होते, अशीही माहिती पुढे आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर देशात आतापर्यंतचा सर्वात मोठा ‘कॉन्टॅक ट्रेसिंग स्टडी’ करण्यात आला. या सर्वेक्षणात आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतील 5 लाख 75 हजार 71 लोकांचा अभ्यास करण्यात आला. यातील 84,965 लोक कोरोनाचे कन्फर्म रुग्ण होते. या लोकांच्या संपर्कातील लाखो लोकांच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला. यात 8 टक्के कोरोनाग्रस्तांमुळे 60 टक्के नवीन रुग्ण आढळले. हेच ‘सुपर प्रेडर्स’ लोक कोरोनाच्या फैलावाला प्रमुख कारण बनल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. सर्वेक्षणातील निष्कर्ष ‘सायन्स जर्नल’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
सर्वेक्षणातील विविध निष्कर्ष
कोरोनामुळे मृत्यू झालेले 63 टक्के रुग्ण आधीपासून दुसऱया आजाराने त्रस्त होते, तर 36 टक्के लोक दोन वा त्यापेक्षा अधिक व्याधींनी ग्रासलेले होते. तसेच प्राण गमावलेल्या 46 टक्के लोकांना मधुमेहाचा त्रास होता.
समान वयाच्या लोकांच्या संपर्कामध्ये कोरोना संसर्गाचा अधिक धोका आहे. 0 ते 14 वर्षाच्या मुलांमध्ये अशा संसर्गाचे जास्त प्रमाण आढळले. त्यापाठोपाठ 65 वर्षापुढील लोकांमध्ये संसर्ग झाला आहे.
देशात प्रांतानुसार वेगवेगळ्या प्रकारचे जेनेटिक म्युटेशन झाले आहे. त्यामुळे विविध भागांत कोरोनाचा वेगवेगळा मृत्यू दर नोंद झाला आहे. म्युटेशन लोकांमधील कोरोना विषाणूचा धोका कमी करतो, असे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीने म्हटले आहे.

























































